( शहापूर )
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील अस्नोली गावातून काळीज पिळवटून टाकणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. तीन चिमुकल्या मुलींच्या संगोपनाचा ताण सहन न झाल्यामुळे आईनेच आपल्या तिन्ही मुलींना विष देऊन मृत्यूच्या खाईत लोटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या दुर्दैवी मुलींची नावे काव्या संदीप भेरे (वय 10), दिव्या संदीप भेरे (वय 8) आणि गार्गी संदीप भेरे (वय 5) अशी आहेत. प्राथमिक माहितीनुसार, तिन्ही मुलींना जेवणातून कीटकनाशक औषध दिले गेले. विषबाधेमुळे तब्येत बिघडताच त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, काव्या आणि दिव्याचा मृत्यू मुंबईतील नायर रुग्णालयात, तर गार्गीचा मृत्यू नाशिक जिल्ह्यातील घोटी येथील एस.एम.बी.टी. रुग्णालयात उपचारादरम्यान झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी पती-पत्नीमध्ये झालेल्या किरकोळ वादानंतर संबंधित महिला चेरपोली येथील सासरहून माहेरी अस्नोली येथे येऊन राहत होती. ती आर्थिक अडचणी, मानसिक तणाव आणि तिन्ही मुलींच्या जबाबदाऱ्यांमुळे नैराश्यात होती. या मानसिक अवस्थेत तिने टोकाचा निर्णय घेतल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी किन्हवली पोलिस ठाण्यात तिच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तिला अटक केली आहे. आईची भूमिका संशयास्पद वाटल्याने तिची कसून चौकशी करण्यात आली. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.
एकाच वेळी तिन्ही चिमुकल्या बहिणींचा मृत्यू झाल्याने अस्नोली गावात आणि परिसरात शोककळा पसरली आहे. गावकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आणि मनात अस्वस्थता आहे. आईच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना समाजमनाला हादरवून टाकणारी आहे.