(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरातील सेंट थॉमस शाळेत ९ ते १४ वयोगटातील १०५ मुलींना एचपीव्ही (HPV) लसीकरण यशस्वीरीत्या करण्यात आले. आयुष्मान आरोग्य मंदिर, पोमेंडी बुद्रुक (प्राथमिक आरोग्य केंद्र चांदेराई) यांच्या वतीने शुक्रवारी (९ जानेवारी २०२६) ही लसीकरण मोहीम राबविण्यात आली.
लसीकरणानंतर कोणत्याही प्रकारची गुंतागुंत अथवा दुष्परिणाम आढळून आले नसल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान विद्यार्थिनी, पालकवर्ग तसेच शाळेतील शिक्षकवर्गाकडून उत्स्फूर्त सहकार्य व सकारात्मक प्रतिसाद लाभला.
गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी एचपीव्ही लस अत्यंत प्रभावी मानली जाते. योग्य वयात हे लसीकरण केल्यास भविष्यातील गंभीर आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
या लसीकरण मोहिमेत प्राथमिक आरोग्य केंद्र चांदेराईच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतल सूर्यवंशी, समुदाय आरोग्य अधिकारी (सीएचओ) श्रीमती अंभोरे, आरोग्य सेविका श्रीमती रसाळ, पालशेतकर, स्वाती शिंदे, अनुश्री शिंदे, श्रीमती फुकट, आरोग्य सेवक चव्हाण, गट प्रवर्तक श्रीमती इंदुलकर तसेच आशा सेविका श्रीमती पांचाळ, लांजेकर, कुळीये, मोरे व तेरवणकर यांनी सक्रिय सहभाग घेतला.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यात एचपीव्ही लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत असून, पात्र लाभार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

