(नवी दिल्ली)
“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशासाठी काही मोठं आव्हान नाहीत. त्यांच्या भोवती तयार झालेली ‘हवा’ ही केवळ काही मोजक्या माध्यमांनी निर्माण केलेली आहे. प्रत्यक्षात त्यांच्या नेतृत्वात दम नाही,” असा तीव्र हल्ला काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला.
ते तालकटोरा स्टेडियम येथे आयोजित ओबीसी सेलच्या ‘भागीदारी न्याय संमेलनात’ बोलत होते. “राजकारणातील सर्वात मोठी समस्या काय?” असा प्रश्न त्यांनी श्रोत्यांना विचारला असता, गर्दीतून “पीएम मोदी” अशी जोरदार प्रतिक्रिया आली. यावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, “मोदी हे काही मोठं संकट नाही. मी त्यांना दोन-तीन वेळा प्रत्यक्ष भेटलो आहे. ती केवळ बाह्य चमक आहे – एक फुगवलेला फुगा. प्रत्यक्षात त्यांच्यात कणभरही दम नाही.”
“प्रादेशिक भाषा सर्वच महत्त्वाच्या – इंग्रजीही सोबत गरजेची”
राहुल गांधी यांनी भाषाविषयक धोरणावरही भाजपवर निशाणा साधला. “भारतातील प्रत्येक प्रादेशिक भाषा – हिंदी, पंजाबी, तमीळ, बंगाली, कन्नड – सारख्याच महत्त्वाच्या आहेत. इंग्रजीही त्या सोबत असायलाच हवी,” असे ते म्हणाले. भाजपच्या इंग्रजी विरोधी भूमिकेवर टीका करताना त्यांनी प्रश्न केला की, “जे लोक इंग्रजीविरोधात बोलतात, त्यांच्या मुलं परदेशात शिकायला जातात, मग तिथे ते हिंदी माध्यमातून शिक्षण घेतात का?”
राहुल गांधी यांच्या या भाषणामुळे पुन्हा एकदा मोदीविरोधी राजकीय रणधुमाळी पेटण्याची शक्यता आहे.