(देवरूख / प्रतिनिधी)
पश्चिम महाराष्ट्रातील वाळवा तालुक्यातील युवक आणि जलजीवन मिशन योजनेत कार्यरत असलेले पोटठेकेदार हर्षल पाटील याने शासनाकडून थकीत बिलांचा न मिळालेला मोबदला, कर्जाचा वाढता बोजा आणि देणेकऱ्यांच्या तगाद्याला कंटाळून आत्महत्या केल्याची दुःखद घटना घडली आहे.
हर्षल पाटील यांनी गेल्या दोन वर्षांपासून जलजीवन मिशन अंतर्गत विविध नळपाणीपुरवठा योजना यशस्वीरीत्या पूर्ण केल्या होत्या. कामासाठी आवश्यक साहित्य, यंत्रसामग्री त्यांनी स्वतःच्या खर्चाने आणि व्यापाऱ्यांकडून उधारीवर घेऊन प्रकल्प पूर्णत्वास नेले. मात्र, जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून निधी उपलब्ध नसल्याचे कारण देत संबंधित कामांचे बिल न अदा केल्याने, हर्षल यांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागले. शेवटी, या प्रचंड ताणाला कंटाळून त्यांनी आपले जीवन संपवले.
ही केवळ हर्षल पाटील यांची वेदनादायी कहाणी नसून, राज्यातील अनेक ठेकेदार व त्यांच्या नावावर काम करणाऱ्या पोटठेकेदारांचीही हीच दैना झाली आहे. शासनाच्या बेपर्वा धोरणांमुळे अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडली आहेत.
या पार्श्वभूमीवर संगमेश्वर ठेकेदार संघटनेतर्फे देवरूख येथील पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात कै. हर्षल पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी शासनाच्या उदासीनतेचा तीव्र निषेध व्यक्त करत, ठेकेदारांचे प्रलंबित बिले तातडीने अदा करण्याची मागणी केली.