(संगमेश्वर)
लोवले वरचेवठार (ता. संगमेश्वर) येथील ५४ वर्षीय विनय परशुराम पवार यांचा झोपेतून अचानक खाली पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (१३ जुलै) दुपारी उघडकीस आली. या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विनय पवार हे आपल्या राहत्या घरी हॉलमधील सोफ्यावर झोपले होते. त्यावेळी अचानक ते खाली कोसळले. ही घटना लक्षात येताच त्यांचे चुलत भाऊ आणि शेजारी असलेल्या नातेवाईकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय संगमेश्वर येथे दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी संगमेश्वर पोलिस ठाण्यात आमू. क्र. २१/२०२५ अन्वये भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम १९४ नुसार नोंद करण्यात आली आहे. मृत्यूचे नेमके कारण अजून स्पष्ट झाले नसले, तरी संपूर्ण परिसरात या अचानक घडलेल्या घटनेमुळे शोककळा पसरली असून, पवार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.