(फुणगुस / साजिद खान)
‘डिजिटल इंडिया’, ‘स्मार्ट व्हिलेज’ आणि ‘ई-गव्हर्नन्स’ अशा योजना सरकारकडून मोठ्या घोषणांसह राबविल्या जात असतानाही संगमेश्वर तालुक्यातील फुणगुस हे गाव आजही मोबाईल नेटवर्कविना अंधारातच अडकलेले आहे. गावात BSNL चा टॉवर उभा राहून दोन वर्षे उलटली, तरीही तो अद्याप कार्यान्वित न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आता मात्र संयम सुटत असून, नेटवर्क सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
जमीन ग्रामस्थांनी दिली, टॉवर पूर्ण… तरीही सेवा नाही!
गावात सुरुवातीला जागेअभावी टॉवरचे काम रखडले होते. मात्र ग्रामस्थांनी पुढाकार घेत जमीन उपलब्ध करून दिली. त्यानंतर ऑक्टोबर २०२४ मध्ये सामाजिक कार्यकर्ते सुभाष लांजेकर, साहिल खान, अफाक बोदले, आणि परवेज नाईक यांनी खासदार नारायण राणे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांना लेखी निवेदन दिले. त्यानंतर कामास गती मिळाली आणि काही महिन्यांत टॉवरचे बांधकाम पूर्ण झाले. पण आजही तो निष्क्रिय अवस्थेत उभा आहे.
नेटवर्कअभावी जीवन विस्कळीत
फुणगुसमध्ये नेटवर्क नसल्यामुळे नागरिकांना बँक व्यवहार, आधार लिंकिंग, ऑनलाईन शिक्षण, आरोग्य सेवा व शासकीय योजनांचा लाभ घेण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. किरकोळ ऑनलाईन कामांसाठीसुद्धा तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. आजारी व्यक्तीसाठी तात्काळ मदतीचा कॉल करणेही अशक्य बनले आहे. दैनंदिन संवादात तर अडथळेच अडथळे!
तक्रारी, आश्वासनं… पण नेटवर्क काही आलंच नाही!
ग्रामस्थांनी वेळोवेळी BSNL कार्यालयात तक्रारी केल्या, लोकप्रतिनिधींना भेटून विनंत्या केल्या. पण त्यांना दरवेळी आश्वासनंच मिळाली. “जमीन दिली, सहकार्य केलं… मग नेटवर्क का नाही?” असा संतप्त सवाल आता ग्रामस्थ करत आहेत. टॉवर उभा आहे, पण सेवा नाही – जणू एखादा निष्प्राण देखावा!
आंदोलनाचा पवित्रा निश्चित
ग्रामस्थांनी आता स्पष्ट इशारा दिला आहे की, जर लवकरच टॉवर कार्यान्वित न झाला, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल. ‘डिजिटल इंडिया’चा नारा फोल वाटतो, जेव्हा गावं दोन वर्षांपासून नेटवर्कच्या प्रतीक्षेत असतात. त्यामुळे शासन व संबंधित यंत्रणांनी या प्रश्नाची तत्काळ दखल घ्यावी, अशी जोरदार मागणी आता होत आहे.