( नवी दिल्ली )
देशात सायबर फसवणुकीचे प्रकार वेगाने वाढत असून, सायबर ठगांनी आता एक नवा आणि अधिक धोकादायक मार्ग शोधला आहे. फेक लिंक, बनावट अॅप किंवा ईमेलऐवजी मोबाईलमधील सर्वसामान्य फीचर वापरून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. या नव्या प्रकाराला “कॉल फॉरवर्डिंग स्कॅम” असे म्हटले जाते. या स्कॅममुळे बँक खाते, सोशल मीडिया अकाउंट्स आणि वैयक्तिक माहिती गंभीर धोक्यात येऊ शकते.
या वाढत्या धोक्याबाबत गृह मंत्रालयाअंतर्गत कार्यरत इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) ने देशभरातील मोबाईल वापरकर्त्यांसाठी महत्त्वाचा अलर्ट जारी केला आहे. विशेष म्हणजे या फसवणुकीत कोणतीही लिंक क्लिक करावी लागत नाही किंवा अॅप डाउनलोड करावे लागत नाही. फक्त एक कोड डायल केल्यानेच फसवणूक होते, त्यामुळे नागरिकांनी विशेष सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
काय आहे कॉल फॉरवर्डिंग स्कॅम?
कॉल फॉरवर्डिंग हे मोबाईलमधील एक सामान्य फीचर आहे. यामध्ये येणारे कॉल दुसऱ्या नंबरवर वळवता येतात. मात्र सायबर ठग या फीचरचा गैरवापर करून युजर्सचे कॉल आणि ओटीपी स्वतःकडे वळवतात. एकदा कॉल फॉरवर्डिंग सुरू झाली की, बँक किंवा अॅपकडून येणारे सर्व महत्त्वाचे कॉल थेट ठगांपर्यंत पोहोचतात.
फसवणूक कशी केली जाते?
या स्कॅमची सुरुवात सहसा एका फोन कॉल किंवा एसएमएसपासून होते. ठग स्वतःला कुरिअर कंपनीचा कर्मचारी, डिलिव्हरी एजंट किंवा सर्व्हिस प्रतिनिधी म्हणून ओळख करून देतात. तुमच्या नावावर पार्सल आले आहे, डिलिव्हरीमध्ये अडचण आहे किंवा माहिती अपडेट करायची आहे, असे सांगून विश्वास संपादन केला जातो. त्यानंतर समस्या सोडवण्यासाठी एक यूएसएसडी कोड डायल करण्यास सांगितले जाते.
यूएसएसडी कोड म्हणजे धोका
हे यूएसएसडी कोड बहुतांश वेळा 21, 61 किंवा 67 या आकड्यांनी सुरू होतात. युजरने हा कोड डायल करताच फोनमधील कॉल फॉरवर्डिंग फीचर सक्रिय होते. त्यानंतर बँकेकडून येणारे ओटीपी, व्हेरिफिकेशन कॉल आणि अलर्ट कॉल्स थेट सायबर ठगांच्या फोनवर जातात.
ओटीपी मिळाल्यावर काय होते?
ओटीपी आणि कॉल्स मिळाल्यानंतर ठग बँक खात्यातून पैसे काढू शकतात, तसेच व्हॉट्सअॅप, टेलेग्रामसारखी सोशल मीडिया अकाउंट्स हॅक करू शकतात. अनेकदा युजरला फसवणूक झाल्याचे कळेपर्यंत खात्यातील रक्कम आधीच काढून घेतलेली असते.
संशय असल्यास तात्काळ काय करावे?
जर फोनमध्ये कॉल फॉरवर्डिंग चुकीने सुरू झाल्याची शंका वाटत असेल, तर तात्काळ खालील कोड डायल करा:
##002#
हा कोड डायल केल्यास सर्व प्रकारची कॉल फॉरवर्डिंग बंद होते आणि कॉल पुन्हा थेट युजरच्या फोनवर येऊ लागतात. गृह मंत्रालय आणि I4C ने नागरिकांना अशा प्रकारचे कोड कोणाच्याही सांगण्यावरून डायल करू नयेत, असा ठाम इशारा दिला आहे.

