(संगमेश्वर)
देवरुख येथे विद्याभारती कोकण–मुंबई संलग्नित, विद्याभारती रत्नागिरी जिल्हा संचलित जिजाऊ शिशु वाटिका यांच्या वतीने ‘सप्तशक्ती संगम’ माता–पालक मेळावा नृसिंह लक्ष्मी मंगल कार्यालयात उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात मनाली जोशी यांच्या स्वागताने झाली. परिचय श्रेया फाटक यांनी करून दिला. या मेळाव्यात आदर्श महिलांचा सन्मान तसेच विविध प्रेरणादायी महिला व्यक्तिमत्त्वांचे वेशभूषा सादरीकरण करण्यात आले. समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांची ओळख करून देणारे व्यक्तिमत्त्व रेखाटन पालकांनी सादर केले.
यामध्ये सिंधुताई सकपाळ (वैष्णवी गिरी), मिसाईल वुमन (श्रेया फाटक), पी. टी. उषा (पूर्वा निवळकर), निर्मला सीतारामन (सुस्मिता भोसले), फाल्गुनी नायर (विद्या कदम) आणि सुधा मूर्ती (आश्विनी पावस्कर) यांची सादरीकरणे विशेष ठरली.
याच कार्यक्रमात मानधन न घेता समाजासाठी अविरत कार्य करणाऱ्या, विशेषतः विधवा व एकल महिलांच्या न्याय व हक्कांसाठी लढणाऱ्या चक्रभेदी सोशल फाउंडेशनच्या वैदेही सुधीर सावंत यांचा मानपत्र, तुळशीचे रोप आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यावर आधारित पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.
“राष्ट्रीय पुरस्कारापेक्षा आपल्या गावात, आपल्या माणसांकडून मिळणारा सन्मान अधिक आनंद देणारा आहे. हा सत्कार पुढे काम करत राहण्यासाठी नवी ऊर्जा देणारा आहे,” अशी भावना सावंत यांनी व्यक्त केली.
यावेळी सुनीता माईन, जाईदा केळकर आणि रचना भोई यांच्या कार्याचाही गौरव करण्यात आला. जिजाऊ शिशु वाटिकेच्या मुख्याध्यापिका साक्षी कदम यांनी पालकांच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक करत, विधवा महिलांना समाजात सन्मान मिळावा यासाठी वैदेही सावंत सातत्याने कार्यरत असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या वर्षा फाटक यांनी नगरपंचायत व ग्रामपंचायत स्तरावर महिला सक्षमीकरणासाठी राबवता येणाऱ्या उपक्रमांवर मार्गदर्शन केले. पर्यावरण संवर्धन, मुली व महिलांच्या सर्वांगीण प्रगतीच्या विविध पैलूंवर त्यांनी प्रकाश टाकला.
कार्यक्रमाला नगराध्यक्षा मृणाल शेट्ये प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. जिजाऊ शिशु वाटिकेच्या व्यवस्थापिका पल्लवी आपटे, शिक्षकवृंद आणि पालकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. सूत्रसंचालन युगश्री जोशी व अनन्या पेंढारकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन मीनल दळवी यांनी केले.

