(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर येथील पोस्ट कार्यालयात सुरू असलेल्या मनमानी, ढिसाळ आणि निष्काळजी कारभाराचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून, विशेषतः आधार कार्डशी संबंधित सेवा मिळत नसल्याने ग्राहक वर्ग अक्षरशः त्रस्त झाला आहे. पोस्ट कार्यालयात आधार सेवांचा उल्लेख करणारे फलक लावण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात मात्र नागरिकांना विविध कारणे पुढे करून वारंवार परत पाठवले जात असल्याचे वास्तव समोर आले आहे.
कधी यंत्रणा बंद, कधी नेटवर्क प्रॉब्लेम, तर कधी कॉम्प्युटर बंद आहे किंवा कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, अशी नेहमीची कारणे देऊन ग्राहकांची बोळवण केली जात आहे. विशेष म्हणजे, गेल्या महिनाभरापासून कॉम्प्युटर बंद असल्याचे उत्तर नागरिकांना दिले जात असल्याने ग्राहकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. आधार कार्ड अद्ययावत करणे, मोबाईल क्रमांक लिंक करणे, दुरुस्ती करणे आदी सेवा उपलब्ध असल्याचे दर्शवणारे फलकही अचानक गायब झाल्याचे दिसून येत असून, त्यामुळे या सेवा प्रत्यक्षात सुरू आहेत की बंद, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
संगमेश्वर परिसरातील पंधरा ते वीस गावांमधील नागरिक या पोस्ट कार्यालयावर अवलंबून आहेत. मात्र आधार कार्डची कामे होत नसल्याने अनेकांना रिकाम्या हाताने, निराश मनाने परतावे लागत आहे. वेळ, प्रवासाचा खर्च आणि मेहनत वाया गेल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
इतकेच नव्हे, तर पोस्ट कार्यालयातील आर्थिक व्यवहारांबाबतही गंभीर तक्रारी समोर येत आहेत. अनेक वेळा सकाळी अकरा वाजताच आर्थिक व्यवहारांची वेळ संपली आहे, असे कारण सांगून ग्राहकांना परत पाठवले जात असल्याने पेन्शन, बचत खाते तसेच जमा–वजा व्यवहारांसाठी आलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
हा प्रकार म्हणजे संगमेश्वर पोस्ट कार्यालयातील मनमानी कारभाराचा कळस असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली असून, या वागणुकीमुळे पोस्ट विभागाविषयीचा विश्वास डळमळीत होत चालला आहे. प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन आधार व आर्थिक सेवा सुरळीत सुरू कराव्यात, तसेच ग्राहकांना नाहक त्रास देणाऱ्या कारभाराची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

