(मुंबई)
मुंबई महानगरपालिका निवडणूक 15 जानेवारी रोजी होत असून, यंदाची लढाई केवळ उमेदवारांपुरती मर्यादित राहिलेली नाही. ही निवडणूक आता परंपरा विरुद्ध तंत्रज्ञान, घोषणा विरुद्ध अल्गोरिदम आणि रॅली विरुद्ध रील्स अशी बहुरंगी झाली आहे. रस्त्यांवर ढोल-ताशांचा गजर सुरू असतानाच, मोबाईल स्क्रीनवर एआय निर्मित पोस्टर्स, व्हिडिओ आणि रील्सचा जोरदार मारा सुरू आहे. यंदा ही निवडणूक राजकीय लढतीसोबतच डिजिटल माध्यमे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेची महास्पर्धा ठरत आहे.
पारंपरिक प्रचार अजूनही प्रभावी
मुंबईच्या गल्लीबोळांत रॅली, पदयात्रा आणि सभांचा जोर कायम आहे. शिवसेना (उबाठा), मनसे, भाजपासह विविध पक्षांचे उमेदवार थेट जनतेत उतरले आहेत. हातात झेंडे, घोषणा आणि कार्यकर्त्यांचा उत्साह हे चित्र अजूनही मतदारांना भावते. दाट वस्तीच्या भागांत उमेदवार घराघरांत जाऊन संवाद साधताना दिसत आहेत. पाणी, रस्ते, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन आणि आरोग्य हे मुद्दे आजही चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत.
प्रचार साहित्य विक्रेते सांगतात की, यंदा प्रचार साहित्य दिल्लीवरून मागवण्यात आले आहे. सर्व पक्षांची चिन्हे असलेले गमछे, बिल्ले, झेंडे आणि काही नवीन इलेक्ट्रिक साहित्य उपलब्ध आहे. मात्र, काही प्रमुख पक्षांनी थेट उमेदवारांना साहित्य पुरवल्याने यंदा विक्री अपेक्षेइतकी होत नाही.
खरी रणभूमी मोबाईल स्क्रीनवर
यंदा प्रचाराची खरी रणभूमी रस्त्यांपेक्षा मोबाईलवर अधिक सरकली आहे. पूर्वी भिंतींवर पोस्टर्स दिसायचे, आता ते काही सेकंदांत व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये पोहोचत आहेत. व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर पोस्टर्स, व्हिडिओ आणि रील्सचा अक्षरशः पाऊस पडतो आहे. युवकांना आकर्षित करण्यासाठी मीम्स, ट्रेंडी गाणी आणि झपाट्याने एडिट केलेले व्हिडिओ वापरले जात आहेत. वॉर्डनिहाय ग्रुप, मतदारनिहाय संदेश, व्हॉईस नोट्स आणि लघु व्हिडिओ क्लिप्स हे प्रचाराचे नवे शस्त्र ठरत आहे.
पोस्टर वॉर नाही, पण चर्चा जोरात
“काम बोलतंय”, “यंदा बदल हवा”, “तुमच्यासाठीच आम्ही” अशा थेट संदेश देणाऱ्या पोस्टर्समुळे मतदारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. कोणाचा पोस्टर कोणाला उद्देशून आहे, यावर सोशल मीडियावर चर्चा रंगत आहेत.
प्रचारात एआयचा धडाकेबाज वापर
यंदाची निवडणूक वेगळी ठरण्याचे प्रमुख कारण म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठ्या प्रमाणावर वापर. पूर्वी मोठ्या जाहिरात जाहिरात एजन्सी लागायच्या, आता उमेदवार स्वतः एआय टूल्सच्या मदतीने पोस्टर्स, स्लोगन, भाषांतर, व्हिडिओ आणि ग्राफिक्स काही मिनिटांत तयार करत आहेत. त्यामुळे लहान उमेदवारांनाही मोठ्या पक्षांसारखी डिजिटल ताकद मिळत आहे. एकाच मजकुराचे विविध भाषांतील प्रकार तयार केल्याने प्रचार अधिक व्यापक झाला आहे.
सोयही आणि धोका देखील
एआयमुळे प्रचार अधिक मनोरंजक झाला आहे. विनोदी पात्रे, हलकेफुलके संवाद आणि कॉमिक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. मात्र, डीपफेक, बनावट आवाज आणि दिशाभूल करणाऱ्या क्लिप्समुळे मतदार गोंधळात पडण्याची भीतीही वाढली आहे. एआय केवळ पोस्टर किंवा व्हिडिओ तयार करत नाही, तर मतदारांचे वर्तनही अभ्यासते. कोणत्या भागात कोणते मुद्दे प्रभावी ठरतात, कोणत्या वयोगटाला कोणता संदेश भावतो आणि कोणत्या वेळेला मेसेज पाठवायचा, हे सगळे डेटा आधारित प्रचारातून ठरवले जात आहे. त्यामुळे यंदाची मुंबई महापालिका निवडणूक अधिक तांत्रिक आणि डिजिटल स्वरूपाची बनली आहे.
निवडणूक आयोग सतर्क
या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने एआय वापराबाबत कडक नियम लागू केले आहेत. एआय निर्मित मजकूर असल्यास स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक आहे. डीपफेक किंवा दिशाभूल करणारा कंटेंट आढळल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. प्रचार करा, पण पारदर्शकपणे, असा स्पष्ट संदेश आयोगाने दिला आहे.
रस्त्यावर घोषणाबाजी आणि स्क्रीनवर अल्गोरिदम यामध्ये अडकलेल्या या निवडणुकीत मतदार विचारपूर्वक निर्णय घेणार की एखादी रील पाहून भावनेने मतदान करणार, हे आता मतमोजणीच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.

