(पुणे)
पुण्यातील आंबेगाव परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, क्लास वन अधिकाऱ्याने आपल्या पत्नीवर संशय घेत तिच्या अंघोळीचे व्हिडिओ चोरून रेकॉर्ड करून तिला ब्लॅकमेल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, पती आणि पत्नी दोघेही क्लास वन अधिकारी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित ३० वर्षीय महिला क्लास वन अधिकारी असून तिने आंबेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, तिच्या पतीने घरात स्पाय कॅमेरे लावून तिच्या अंघोळीचे व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि त्या व्हिडिओच्या आधारे तिला ब्लॅकमेल करत माहेरून कार आणि दीड लाख रुपये आणण्याची जबरदस्ती केली. या प्रकरणात महिलेच्या पतीसह सासरच्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सासू, सासरे, दीर व इतर नातेवाईकांचा समावेश आहे.
पीडित महिलेचे २०२० साली लग्न झाले. सुरुवातीला संसार सुरळीत चालू होता, मात्र काही वर्षांत पतीच्या वागण्यात संशयास्पद बदल झाला. त्याने पत्नीवर संशय घेत तिच्यावर मानसिक आणि आर्थिक दबाव टाकायला सुरुवात केली. वारंवार पैशांची मागणी केली जात होती. घरात नजर ठेवण्यासाठी गुप्त कॅमेरे लावले गेले, असा आरोप महिलेने तक्रारीत केला आहे.
ऑफिसमध्ये गेल्यावर तो अधिकारी त्याच्या क्लास वन ऑफिसर असलेल्या पत्नीवर नजर ठेवायचा. त्यानंतर त्या अधिकाऱ्याने स्वतःच्या बाथरूममध्येही स्पाय कॅमेरे लावले. त्या माध्यमातून पत्नीचे आंघोळीचे व्हिडीओ त्याने रेकॉर्ड केल्याचं समोर आलं. हे आंघोळीचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी त्याने पत्नीला दिली.
हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. स्पाय कॅमेराच्या व्हिडीओंबाबतही तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत. पतीच्या विकृत वागणुकीमुळे पोलिसही हादरले आहेत.