(रत्नागिरी)
मुंबई-गोवा तसेच मिऱ्या-नागपूर या राष्ट्रीय महामार्गांवरील निकृष्ट कामांमुळे रत्नागिरी परिसरात सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी तालुका मनसे अध्यक्ष श्री. रूपेश जाधव यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांच्याकडे ठेकेदार कंपन्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची ठाम आणि आग्रही मागणी केली आहे.
गेली कित्येक वर्षे प्रलंबित असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे तसेच सध्या सुरू असलेल्या मिऱ्या-नागपूर महामार्गाचे काम अत्यंत बेफिकिरीने आणि निष्काळजीपणे सुरू आहे. अपूर्ण नियोजन, अपुरी सुरक्षा यंत्रणा आणि ठेकेदारांकडून होत असलेला मनमानी कारभार यामुळे रस्त्यांवर अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. रत्नागिरी तालुक्यात आणि आजूबाजूच्या परिसरात यामुळे अनेक पादचारी, दुचाकीस्वार आणि सर्वसामान्य नागरिक हकनाक आपला जीव गमावत आहेत.
या ठेकेदार कंपन्यांमध्ये ईगल इन्फ्रास्ट्रक्चर, रवी इन्फ्रा लिमिटेड यांसारख्या कंपन्यांचा उल्लेख करताना मनसेने स्पष्ट केले आहे की, या कंपन्यांचे काम अपूर्ण, बेजबाबदार आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे. विशेषतः JSW पोर्ट लिमिटेड या कंपनीसाठी काम करणारी अवजड वाहने रस्त्यावर बेधडकपणे धावत असून, निवळी – गणपतीपुळे मार्गावर वारंवार अपघात घडत आहेत. दुर्दैव म्हणजे या अपघातांमध्ये जखमी अथवा मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना आजतागायत कोणतीही नुकसानभरपाई मिळालेली नाही. या गोष्टीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र निषेध नोंदवला असून प्रशासनाने तातडीने याची दखल घेणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे.
मनसेने स्पष्टपणे म्हटले आहे की, पक्ष विकासकामांना विरोध करत नाही. मात्र, विकासाच्या नावाखाली जर स्थानिक नागरिकांचे प्राण धोक्यात येणार असतील, तर अशा प्रकारच्या विकासाला मनसे कोणत्याही परिस्थितीत मान्यता देणार नाही. सध्या राज्य शासन काही नवीन महामार्ग प्रकल्पांच्या भू-संपादन प्रक्रियेत आहे. मात्र आधीच्या अनुभवावरून असे दिसून येते की, ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या अशा दुर्घटनांबाबत ठोस कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. मनसेने जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या निवेदनात स्पष्ट मागणी केली आहे की, या अपघातांना जबाबदार असलेल्या ठेकेदार कंपन्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. त्याचबरोबर अशा अपघातांत बळी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई देण्यासाठीही तातडीने निर्णय घेण्यात यावा.
या निवेदनावर जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित यंत्रणांची बैठक लवकरच आयोजित करण्याचे आश्वासन दिले. निवेदन देताना मनसे तालुका अध्यक्ष श्री. रूपेश जाधव यांच्यासोबत तालुका उपाध्यक्ष श्री. राजू पाचकुडे, श्री. विशाल चव्हाण, विभाग अध्यक्ष श्री. सोमनाथ पिलणकर, श्री. सागर मयेकर यांच्यासह अन्य मनसे पदाधिकारी उपस्थित होते. या सर्व शिष्टमंडळाने अत्यंत संयमाने परंतु ठामपणे आपली भूमिका मांडत जिल्हाधिकाऱ्यांकडून त्वरित कारवाईची अपेक्षा व्यक्त केली.