रेल्वे विभाग प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर, सोयीस्कर आणि आनंददायी करण्यासाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत असतो. तिकीट आरक्षण, वेटिंग तिकीट, तत्काळ सेवा, रिझर्वेशन शुल्क यामध्ये अनेक सकारात्मक बदल करून प्रवाशांच्या सोयीसाठी विविध पावले उचलण्यात आली आहेत. याच पार्श्वभूमीवर आता रेल्वे विभागाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ‘भारत गौरव यात्रा’ या विशेष टूर पॅकेजसाठी तिकीटाची रक्कम हप्त्याने (EMI) भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. म्हणजेच, आता प्रवासासाठी एकरकमी मोठी रक्कम भरण्याची अडचण असलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
‘भारत गौरव यात्रा’ – खास टूर पॅकेज
रेल्वेच्या आयआरसीटीसी (IRCTC) विभागातर्फे देशातील विविध प्रसिद्ध तीर्थस्थळांसाठी आणि पर्यटनस्थळांसाठी विशेष टूर पॅकेजेस देण्यात येतात. ‘भारत गौरव यात्रा’ हे अशाच विशेष पॅकेजपैकी एक आहे, ज्यामध्ये प्रवाशांना ट्रेन, हॉटेल, आणि भोजन यांचा समावेश असलेली एक सुसज्ज यात्रा मिळते. या योजनेनुसार, प्रवाशांना तिकीटाची रक्कम एकदम भरावी लागणार नाही. प्रवासानंतर ते हप्त्याने (EMI) ही रक्कम भरू शकतात. विशेषतः ज्या प्रवाशांना मोठ्या रकमेची अडचण आहे, त्यांच्यासाठी ही योजना खूप उपयुक्त ठरणार आहे.
फक्त ‘भारत गौरव ट्रेन’साठीच EMI सुविधा
ही EMI सुविधा सध्या फक्त भारत गौरव ट्रेनसाठीच उपलब्ध आहे. या ट्रेनसाठी तिकीट बुक करताना IRCTC च्या संकेतस्थळावर EMI चा पर्याय निवडता येतो.
उदाहरणार्थ, 13 ऑगस्ट ते 22 ऑगस्टदरम्यानच्या भारत गौरव यात्रेचे दर खालीलप्रमाणे आहेत:
- इकोनॉमी क्लास: ₹18,460 प्रति व्यक्ती (स्लीपर कोच, हॉटेल, भोजन यांचा समावेश)
- थर्ड एसी कोच: ₹30,480 प्रति व्यक्ती
- कम्फर्ट श्रेणी: ₹40,300 प्रति व्यक्ती
कुटुंबासह प्रवास करताना खर्च अधिक येतो, त्यामुळे EMI ही एक महत्त्वाची सुविधा ठरते.
भारत गौरव ट्रेनच्या बुकिंगसाठी प्रवाशांना LTC (Leave Travel Concession) आणि EMI या दोन्ही सुविधांचा लाभ घेता येतो. IRCTC ने यासाठी अनेक सरकारी आणि खासगी बँकांशी करार केले आहेत. बुकिंग करताना प्रवाशांना EMI पर्याय निवडण्याची सुविधा मिळते. हे बुकिंग “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्त्वावर केले जाते. रेल्वे विभागाचा ‘भारत गौरव यात्रा’ EMI योजनेद्वारे आता लाखो प्रवाशांना आर्थिक अडचण नसताना देखील धार्मिक व पर्यटन प्रवासाची संधी मिळणार आहे. ही योजना देशभरातील प्रवाशांसाठी एक मोठी दिलासादायक सुविधा ठरणार आहे.