(रत्नागिरी /प्रतिनिधी)
शहरातील ओसवालनगर परिसरावर शनिवारी आरे-वारे समुद्रकिनाऱ्यावरील दुर्घटनेची काळोखी छाया पडली होती. या भीषण दुर्घटनेत प्राण गमावलेल्या चार जणांचा सोमवारी कोकणनगर येथील कब्रस्तानमध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यविधी पार पडला. मृतदेह घरी पोहोचताच ओसवालनगरमध्ये हंबरडा फुटला आणि साऱ्या परिसरावर शोककळा पसरली.
शनिवारी सायंकाळी तालुक्यातील आरे-वारे किनाऱ्यावर समुद्रस्नानासाठी गेलेल्या जुनैद बशीर काझी (रा. कसबा, संगमेश्वर) व त्यांच्या पत्नी जैनब जुनैद काझी, तसेच जैनब यांच्या दोन बहिणी उज्मा शमशुद्दीन शेख आणि उमेरा शमशुद्दीन शेख हे चौघे जण समुद्राच्या लाटांमध्ये ओढले जाऊन बुडाले होते. काही वेळातच या चारही जणांचे मृतदेह सापडले आणि एकाच कुटुंबातील तिघी बहिणींसह चौघांचा दुर्दैवी अंत झाल्याने रत्नागिरीसह मुंबई व कोकणात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दुर्घटनेनंतर या कुटुंबाचे आई-वडील सौदी अरेबियामध्ये हज यात्रेसाठी गेले असल्याने आणि एकुलता एक भाऊ कतारमध्ये नोकरीनिमित्त असलेल्या या कुटुंबातील दुःख अधिकच गहिरे झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर हे तिघे रविवारी रात्री उशिरा मुंबईत पोहोचले आणि सोमवारी सकाळी रत्नागिरीत दाखल झाले. त्यानंतर मृतदेह ओसवालनगरमधील त्यांच्या घरी आणण्यात आले. मृतदेह पाहताच नातेवाईकांनी टाहो फोडत दुःखाचा बांध फोडला.
दुपारी कोकणनगर येथील कब्रस्तानात चारही मृतांचे अंत्यसंस्कार इस्लाम धर्मिय रीतिरिवाजानुसार करण्यात आले. अंत्यविधीच्या वेळी नातेवाईक, मित्रपरिवार, स्थानिक नागरिक व ओसवालनगरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकाच कुटुंबातील तीन भगिनींसह चौघांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला आहे. या हृदयद्रावक घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत असून, समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षेच्या उपाययोजनांची गरज अधोरेखित झाली आहे.