(जाकादेवी / वार्ताहर)
भारतीय स्वातंत्र्याच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनी मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम कदम कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या स्व-हस्ताक्षरांतून तयार झालेल्या लेखन साहित्यातून देशभक्ती भित्तीपत्रक तयार करण्यात आले. या भित्तीपत्रक अंकाचे उद्घाटन मालगुंड शिक्षण संस्थेचे संचालक आणि जाकादेवी विद्यालयाचे सीईओ किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले .
या अंकाचे संपादन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख संतोष पवार यांनी केले. तर उपसंपादक म्हणून ज्येष्ठ शिक्षक अरुण कांबळे, क्रीडा शिक्षक संतोष सनगरे यांनी काम पाहिले. या अंकात विद्यार्थ्यांच्या कविता, काव्य तसेच संग्रहित नवी व जुनी लोकप्रिय देशभक्तीपर गीते, तसेच क्रांतीकारकांची चित्रे इत्यादींचा समावेश आहे.
भित्तीपत्रक उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक नितीन मोरे, पर्यवेक्षक शाम महाकाळ, शाळेतील सहाय्यक शिक्षक, संपादकीय मंडळातील सक्रिय सदस्य यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाला माजी मुख्याध्यापक नामदेव वाघमारे, माजी मुख्याध्यापक हनुमंत कदम, प्रकाश कांबळे, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष अर्जुन माचिवले, ज्येष्ठ शिक्षक केशव राठोड, अमित बोले, मंदार रसाळ, हेमराज बहिरम, अजिंक्य साळवी, संदेश सोनवडकर,सौ.सायली राजवाडकर, सौ.प्राची पवार, विशाल बारस्कर, कलाध्यापक प्रणित जाधव, क्रिडाशिक्षक किशोर नलवडे, सौ.मनिषा धोंगडे आदी उपस्थित होते.
उपस्थितांचे स्वागत सांस्कृतिक विभागाचे प्रमुख संतोष पवार यांनी केले. सूत्रसंचलन अरुण कांबळे यांनी तर आभार मुख्याध्यापक नितीन मोरे यांनी मानले. प्रारंभी स्वातंत्र्यदिनी संचालक किशोर पाटील यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला.यावेळी राष्ट्रीय गीते, स्काऊट गाईड विभागातर्फे संचलन, कवायत प्रकार, क्रांतिकारकांचा जयघोष करण्यात आला. यावेळी गोपाळ काला उत्सवाच्या निमित्ताने शालेय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहात दहीहंडीचा कार्यक्रम संपन्न केला. स्वातंत्र्यदिनी सर्वच उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी मोलाची सहकार्य केले.
फोटो – जाकादेवी येथे देशभक्ती भित्तीपत्रक उद्घाटन प्रसंगी किशोर पाटील यांचे स्वागत करताना विद्यार्थीनी पायल वेजरे, सोबत मुख्याध्यापक व शिक्षक

