(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे सागरी मार्गावरील आरे-वारे समुद्रकिनारी आज (शनिवारी) सायंकाळी एक भीषण दुर्घटना घडली. फिरण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील चौघे जण त्यामध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश असून त्यांचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या धक्कादायक घटनेने रत्नागिरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या चौघांचा समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेने ओसवाल नगरसह संपूर्ण रत्नागिरीत खळबळ उडाली आहे.
रत्नागिरी तालुक्यात मागील काही दिवसांपासून पावसाची उघडीप असल्याने समुद्रकिनारी पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शनिवार आणि रविवार या दिवशी आरेवारे समुद्रकिनारी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक असते. दरम्यान, ठाणे मुंब्रा येथील उज्मा शामशुद्दीन शेख (१८) आणि उमेरा शामशुद्दीन शेख (२९) या दोघी आपल्या नातेवाईकांकडे रत्नागिरीत पर्यटनासाठी आल्या होत्या. आज सायंकाळी त्या रत्नागिरीतील ओसवालनगर येथील दोघा नातेवाईकांसोबतच आरे-वारे समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेल्या. या चार जणांमध्ये जुनेद बशीर काझी (३० ओसवाल नगर), जैनब जुनेद काझी (२८ ओसवाल नगर) यांचाही समावेश होता. समुद्रात उरलेले चारही जण पाण्यात मोजमस्ती करताना अचानक आलेल्या मोठ्या लाटेत पाण्यात ओढले गेले. अवघ्या काही मिनिटांत चारही जण खोल समुद्रात बुडाल्याने या चारही जणांचा बुडून मृत्यू झाला.
दरम्यान, समुद्र खवळलेला होता आणि पावसामुळे परिस्थिती आणखीनच धोकादायक झाली होती. मात्र, चौघांनीही समुद्रात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी आलेल्या महाकाय लाटांनी त्यांना अचानक आत ओढले आणि काही क्षणांतच ते पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले आणि बुडाले. ही घटना पाहिल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी आणि तेथील पर्यटकांनी या चौघांनाही वाचविण्याचे प्रयत्न केले, मात्र त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले आणि ते चौघेही समुद्रात ओढले गेले.
घटनेची माहिती मिळताच, ग्रामस्थ आणि स्थानिक बचावपथकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. मोठ्या प्रयत्नांनंतर सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सर्वांचे मृतदेह सापडले.
घटनास्थळी पोहोचलेले ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र यादव आणि त्यांच्या पथकाने संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक श्री बघाटे यांनी घटनास्थळाला भेट दिली. मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले असून, पोस्टमार्टेमसाठी कार्यवाही सुरू असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.
पोलिसांनी पूर्वीच या भागात समुद्रात उतरण्यावर बंदी घातली होती. मात्र, पर्यटनाचा आनंद घेण्याच्या नादात अनेकजण ही सूचना दुर्लक्षित करतात. प्रशासनाने नागरिकांना समुद्रकिनाऱ्यांवर जाताना अत्यंत सावध राहण्याचे आणि अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.