(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्ह्यातील कर्ला गावच्या सुपुत्री सुरभी दीपक अभ्यंकर यांनी अमेरिकेतील इंडियाना युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन, इंडियानापोलिस येथून जैव रसायनशास्त्र आणि आण्विक जीवशास्त्र (PhD in Biochemistry and Molecular Biology) या विषयात डॉक्टरेट पदवी मिळवून एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अमेरिकेतून थेट ही पदवी मिळवणाऱ्या त्या रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या विद्यार्थिनी ठरल्या असून, हा जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीच्या इतिहासातील एक गौरवाचा क्षण आहे.
दिमाखदार दीक्षांत सोहळा आणि राष्ट्रीय गौरव
सुरभीना १५ मे २०२५ रोजी इंडियाना युनिव्हर्सिटी, इंडियानापोलिस येथे पार पडलेल्या भव्य मुख्य दीक्षांत समारंभात डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. या समारंभात फक्त पीएच.डी. पदवीधारकांची नावे व्यासपीठावर जाहीर करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्या संशोधन मार्गदर्शकाच्या हस्ते “डॉक्टोरल हूडिंग” करण्यात आले. डॉक्टरेट हूड म्हणजे शालप्रकार, जो राजेशाही निळ्या रंगाचा असून तो विद्येच्या सर्वोच्च शिखराचे प्रतीक मानला जातो. याच समारंभात युनिव्हर्सिटीच्या अध्यक्ष डॉ. पामेला व्हिटन यांनी त्यांची डॉक्टरेट पदवी अधिकृतरीत्या घोषित केली.
यानंतर १६ मे रोजी इंडियाना युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या स्वतंत्र समारंभातही त्यांना पुन्हा एकदा डॉक्टोरल हूडिंगचा सन्मान मिळाला. स्कूल ऑफ मेडिसिनचे डीन यांच्या हस्ते अधिकृत पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
या सोहळ्याच्या स्मरणिकेत सुरभिंच्या शैक्षणिक कामगिरीची विशेष नोंद करण्यात आली होती. त्यांचे नाव Sigma Xi Grants-in-Aid of Research, Elite 50 Graduate Recognition आणि Peter J. Roach Graduate Fellowship या तीन राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित सन्मानांसाठी नमूद करण्यात आले. अशा प्रकारची गौरवसंपन्न मान्यता मिळणे हे फारच थोड्यांना लाभते, आणि ती त्यांच्या गुणवत्ता, सातत्य आणि संशोधनातील प्रावीण्याचा ठसा उमटवते.
सुरभिंची ही प्रेरणादायी वाटचाल म्हणजे चिकाटी, निष्ठा, कुटुंबीयांचा पाठिंबा आणि विज्ञानाबद्दलची अपार आस्था यांचं मूर्तिमंत उदाहरण आहे. रत्नागिरीसारख्या ग्रामीण पार्श्वभूमीतून सुरू झालेला त्यांचा हा शैक्षणिक प्रवास, आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशापर्यंत पोहोचतो, ही बाब नव्या पिढीसाठी निश्चितच प्रेरणास्त्रोत ठरेल.