(संगमेश्वर / मकरंद सुर्वे)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ओझरखोल हे अपघातांचे ठिकाण बनले असून, केवळ चार दिवसांपूर्वीच येथे झालेल्या भीषण अपघाताची धग थंड होत नाही तोच, गुरुवारी सायंकाळी पुन्हा एक अपघात घडला आहे. यामध्ये दुचाकी आणि कारची समोरासमोर धडक होऊन परचुरी येथील दोन सख्खे भाऊ गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींची नावे अथर्व चंद्रशेखर गुरव (वय २१) आणि शुभम चंद्रशेखर गुरव (वय २१), दोघेही रा. परचुरी, ता. संगमेश्वर अशी आहेत. अपघातानंतर स्वामी समर्थ अॅम्ब्युलन्सचे दीपेश राऊत यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत जखमींना प्रथम संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथून पुढील उपचारासाठी दोघांना रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तानुसार, कार चालक रत्नागिरीहून मुंबईच्या दिशेने जात असताना ओझरखोल परिसरात समोरून येणाऱ्या दुचाकीशी धडक झाली. धडकेमुळे दुचाकीवरील अथर्व व शुभम दोघांचेही डोके जोरात आपटल्याने ते गंभीर जखमी झाले. अपघातात कार व दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
ओझरखोल येथे चार दिवसांत घडलेला दुसरा अपघात असल्याने वाहनचालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. महामार्गाचे काम दीर्घकाळापासून रखडले असून, रस्त्यांची दुरवस्था, मोठमोठे खड्डे आणि पावसामुळे निर्माण झालेला चिखल यामुळे प्रवास अत्यंत धोकादायक बनला आहे. यातच ठेकेदाराने अपूर्ण नियोजनात टाकलेले चुकीचे ‘डायव्हर्जन’, स्पष्ट सूचना किंवा मार्गदर्शनाची अनुपस्थिती आणि चुकीची वळणे हे अपघातांचे मुख्य कारण ठरत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
ओझरखोल परिसरात वारंवार होणारे अपघात हे ठेकेदाराच्या अक्षम्य दुर्लक्षाचे आणि नियोजनशून्यतेचे ज्वलंत उदाहरण ठरत आहेत. रस्त्यांवरील खड्डे, चिखल, आणि चुकीची दिशाभूल करणारी वळणं यामुळे चालकांचा गोंधळ उडतो आणि अपघातांना आमंत्रण मिळते. प्रशासन आणि महामार्ग विकास करारदार कंपनीने या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी आता स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून करण्यात येत आहे.