(रत्नागिरी /प्रतिनिधी)
रत्नागिरी एमआयडीसी परिसरातील जे. के. फाईल ते गद्रे कंपनीदरम्यानच्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधणारी बातमी प्रसिद्ध होताच संबंधित प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या.
रस्त्यावरील खोल खड्ड्यांमध्ये माती-मुरूम टाकून ते तात्पुरत्या स्वरूपात भरून काढण्यात आले असून, त्यामुळे वाहनचालकांना होणारा त्रास काही प्रमाणात कमी झाला आहे. औद्योगिक वसाहतीतील हा मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याने रोज शेकडो कामगार, मालवाहतूक वाहने व नागरिक ये-जा करतात. मात्र याच रस्त्यावर खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढल्याने नाराजी व्यक्त केली जात होती.
रत्नागिरी 24 न्यूजच्या माध्यमातून समस्या जनतेसमोर येताच प्रशासनाने दाखवलेली तत्परता उल्लेखनीय ठरली आहे. तात्पुरत्या उपाययोजनेमुळे दिलासा मिळाला असला, तरी या रस्त्याचे कायमस्वरूपी डांबरीकरण करण्यात यावे, अशी अपेक्षा वाहनचालक आणि नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

