(रत्नागिरी / प्रतिनिधी)
महावितरणच्या हलगर्जी आणि बेजबाबदार कारभाराने अखेर दोन निरपराध नागरिकांचे बळी घेतले आहेत. रत्नागिरी तालुक्यातील निवळी (शिंदेवाडी) येथे विजेच्या तारेचा शॉक लागून विदुलता वासुदेव वाडकर (वय 61) आणि चंद्रकांत यशवंत तांबे (वय 43) या दोघांचा मृत्यू झाला. गुरुवारी 17 जुलैला ही दुर्दैवी घटना उघडकीस आली आणि संपूर्ण परिसरात शोककळा पसरली.
आंबा बागेत रान साफ करत असताना तुटलेल्या विजेच्या तारेचा स्पर्श झाल्याने हे दोघे जागीच मृत्युमुखी पडले. विशेष म्हणजे, यापूर्वीच संबंधित विजेच्या तारेबाबत तक्रार देऊनही महावितरणकडून कुठलीही ठोस कारवाई करण्यात आली नव्हती. उलट, वीजपुरवठा बंद न करता “रान स्वतः साफ करा” असा सल्ला दिला गेला. आणि हाच सल्ला या दुर्दैवी मृत्यूला कारणीभूत ठरला.
विदुलता वाडकर यांच्या घराकडे जाणारी विजेची तार दोन दिवसांपासून तुटून जमिनीवर पडलेली होती. यासंदर्भात त्यांनी महावितरणकडे तक्रारही केली होती. मात्र कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा खंडित करण्याचे भानही दाखवले नाही. वाडकर यांना रान साफ करण्यास सांगून पाटी टाकली गेली. महावितरणच्या या बेफिकीर वृत्तीचा परिणाम म्हणून, दोघांचे प्राण गेल्यानंतर आता भरपाईची घोषणा केली जात आहे. ही घटना गुरुवारी सकाळीच घडली असावी. मात्र घटनास्थळ वस्तीपासून लांब आणि झाडीमध्ये असल्याने मृतदेह दिवसभर आंबा बागेतच पडून राहिले. सायंकाळी एका महिलेला मृतदेह दिसल्यानंतर गावात खळबळ उडाली. पोलिसांना कळवून दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.
घटनेनंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात हजेरी लावत मृतांच्या कुटुंबीयांना २० हजार रुपयांची तातडीची मदत आणि प्रत्येकी चार लाख रुपयांची नुकसानभरपाई जाहीर केली. मात्र, चार लाखांची रक्कम एका चुकीच्या निर्णयाने गेलेल्या प्राणांची किंमत ठरू शकते का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. त्याचबरोबर दोषी कर्मचाऱ्यांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. केवळ प्रस्ताव पाठवून जबाबदारीपासून हात झटकणे, ही महावितरणची नेहमीचीच सवय असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्टपणे सांगितले.
महावितरणच्या या मृत्युलीला कारभाराविरोधात ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप आहे. वेळेवर कार्यवाही झाली असती, तर आज दोन जीव वाचू शकले असते. दोषी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. चार लाखांची मदत म्हणजे न्याय नव्हे. महावितरणचा बेजबाबदारपणा जर सुधारला नाही, तर उद्या आणखी कुणी अशा प्रकारे मृत्युमुखी पडले, तर जबाबदार कोण असणार? हा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.
शोकाकुल वातावरण, अंत्यसंस्कारांवेळी अश्रूंचा पूर
विदुलता वाडकर या अविवाहित असून त्या बहिणीसोबत निवळीत राहत होत्या. गुरुवारी त्या एकट्याच होत्या. त्यांच्या बहिणीला ही बातमी समजताच त्या कोसळून पडल्या. शुक्रवारी दुपारी चंद्रकांत तांबे आणि विदुलता वाडकर यांच्यावर गावात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. गावचे सरपंच, पोलीस पाटील आणि अनेक ग्रामस्थ यांनी शोकाकुल वातावरणात त्यांना श्रद्धांजली वाहिली.