(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरातील उद्यमनगर परिसरात रिक्षाचालकाला भरदिवसा रस्त्यात अडवून बेदम मारहाण करत शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. साहिल समीर सोलकर (वय २६, व्यवसाय – रिक्षा चालक, रा. रत्नागिरी) यांच्यावर दोन इसमांनी लोखंडी रॉडने हल्ला केला असून, याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना १७ जुलै २०२५ रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास कबाब कॉर्नर, उद्यमनगर रस्त्यावर घडली. फिर्यादी साहिल सोलकर हे त्यांच्या ताब्यातील रिक्षा (क्र. MH-08-BC-0150) हयातनगर रिक्षा स्टॉपकडे नेत असताना, खलपे हाऊस समोर आरोपी क्र. १ आणि २ हे अॅक्सेस दुचाकीवरून आले व त्यांच्या रिक्षास कट मारत पुढे गेले. त्यानंतर त्यांनी रिक्षाचालकाला शिवीगाळ करत, ‘चंपक मैदानावर ये, मग तुला दाखवतो’ अशी धमकी दिली.
पुढे कबाब कॉर्नर येथे आरोपींनी त्यांच्या दुचाकीने रिक्षाला आडवे अडवले. रिक्षा थांबवल्यावर साहिल सोलकर यांनी विरोध दर्शवताच आरोपी क्र. १ ने त्यांना पाठीमागून पकडले आणि आरोपी क्र. २ ने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता आरोपीने लोखंडी रॉडने सोलकर यांच्या दोन्ही हातांवर व पायांच्या गुडघ्यांवर गंभीर मारहाण केली. यामुळे त्यांना दुखापत झाली आहे.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३२८/२०२५ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), १२७, ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे स्थानिक रस्त्यांवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, संशयित आरोपींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांतून होत आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
हल्लेखोरांना कायद्याचा जराही धाक उरलेला नाही का?
लोकशाही व्यवस्थेत कायदा आणि सुव्यवस्था ही नागरिकांच्या मूलभूत सुरक्षिततेची हमी असते. मात्र, रस्त्यांवर गुंडगिरी करणारे काही जण जर ठामपणे आणि निर्भयपणे एखाद्याला धमकावत, मारहाण करत असतील तर ते केवळ एका व्यक्तीवरचा हल्ला नसतो तो संपूर्ण कायदा-सुव्यवस्थेवरचा आघात असतो. अशा गुन्हेगारांना जर वेळेत आणि कठोर शिक्षा मिळाली नाही, तर ते पुढे आणखी बिनधास्तपणे असे प्रकार करत राहतात. पोलीस आणि प्रशासनाने केवळ गुन्हा दाखल करून न थांबता, जलद व कठोर कारवाई करून अशा हल्लेखोरांना कायद्याचा धडा शिकवणे अत्यंत गरजेचे आहे. या घटनांनी सामान्य नागरिकांमध्ये भीती निर्माण होते आणि कायद्यावरचा विश्वास डळमळीत होतो. त्यामुळे न्यायसंस्थेची आणि प्रशासनाची जबाबदारी अधिक ठळकपणे पुढे येते. कायदा जर वेळेवर आणि प्रभावीपणे कार्यरत राहिला, तरच अशा गुंडांना रोखता येईल. अन्यथा उद्या हेच गुन्हेगार कोणाचा जीव घेतील याची खात्री राहणार नाही. त्यामुळेच, प्रश्न असा उपस्थित होत आहे की, हल्लेखोरांना कायद्याचा धाक उरला आहे की नाही? आणि प्रशासन त्यांना तो पुन्हा दाखवणार आहे की नाही?