(रत्नागिरी)
रत्नागिरी शहरातील बाळासाहेब खेर सर्वोदय छात्रालय येथे वकिली व्यवसायानिमित्त राहणारे मात्र मूळ गाव नाखरे भगवतीवाडी असलेले कल्पेश रविंद्र जाधव (वय-२७ वर्ष) यांना मांडवी समुद्रकिनारी तिघा अज्ञातांनी अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे. या धक्कादायक घटनेने रत्नागिरीत संताप व्यक्त होत आहे.
याबाबत ऍड. कल्पेश रविंद्र जाधव यांनी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, १० फेब्रुवारीच्या रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास मी एकटाच मांडवी समुद्रकिनारी माझ्या मालकीची दुचाकी घेऊन गेलो होतो. तेथे दुचाकीवर बसून गाणी ऐकत होतो. त्यावेळी एक अनोळखी इसम आला व तो माझ्याकडे व माझ्या गाडीकडे बघून तसेच माझ्या गाडीवरील वकीलीचा लोगो बघून पुढे जावून उभा राहिला. त्यानंतर दोन अनोळखी इसम माझ्याजवळ आले. त्यापैकी एकाने मला गांजा आहे का? असे विचारले. त्यावर मी त्यांना नाही असे सांगितले.
त्यानंतर त्यांनी हा वकील आहे म्हणून त्यापैकी एकाने माझी हाताच्या बगलेमध्ये मान धरुन मारण्याच्या हेतून मान दाबली. त्यापैकी एकाने माझ्या गाडीला लावलेले हेल्मेट माझ्या डोक्यावर मारले. त्यानंतर त्या तिघांनी मिळून संगनमताने लाथ्याबुक्क्यांनी मला मारहाण केली. यातील एकाने माझे तोंड गुदमरण्याच्या हेतूने वाळूमध्ये दाबण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मी पळून जावू लागल्याने त्या तिनही इसमांनी माझ्या मागे काचेच्या बाटल्या फेकून मारल्या. त्यानंतर त्या तीन इसमांनी माझ्या गाडीवर लाथा मारुन नुकसान केले, असे वकिल रविंद्र जाधव यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादी यांनी दिलेल्या वर्णनानुसार, आरोपींपैकी एक जण मजबूत शरीरयष्टीचा असून त्याने काळ्या रंगाचे टी-शर्ट आणि थ्री फोर्थ पँट परिधान केले होते. दुसरा इसम मध्यम शरीरयष्टीचा, तर तिसरा सडपातळ होता. या तिनही संशयांविरोधात रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात ११८(१), ११५(२), १२५, ३२४ (४), ३५२, ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.