(देवळे / प्रकाश चाळके)
सप्तलिंगी नदीचे पुनरुज्जीवन, जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविणे आणि संभाव्य दुष्काळावर मात करण्याच्या उद्देशाने आयोजित तिसरी सप्तलिंगी नदी परिषद देवरुख येथील मराठा भवनमध्ये उत्साहात पार पडली. या परिषदेत ५१ जलप्रेमींनी सहभाग घेतला. संपूर्ण सप्तलिंगी पाणलोट क्षेत्रातील गावांमध्ये पाच सदस्यीय समित्या स्थापन करण्यासह जलसंधारणाच्या विविध उपाययोजनांचा प्राथमिक कृती आराखडा निश्चित करण्यात आला. नियोजित सभागृहात ऐनवेळी बदल करावा लागल्याने काही नागरिकांना परत जावे लागले; मात्र उपस्थितांच्या सहभागातून परिषद सुरळीत पार पडली.
जलसाक्षर समिती महाराष्ट्र राज्याचे जलयोद्धा शहनवाज शाह, जलप्रेमी युयुत्सु आर्ते, सोळजाई ग्रामदेवस्थानचे अध्यक्ष बापू गांधी, देवरुख महाविद्यालयाचे उपप्राचार्य सरदार पाटील आणि साडवलीचे प्रकाश डोंगरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. देवरुखच्या नगराध्यक्षा मृणालताई शेट्ये, माजी उपनगराध्यक्ष अभिजित शेट्ये, नगरसेवक रुपेश भागवत, माजी पंचायत समिती सभापती संतोष लाड यांच्यासह विविध गावांतील सरपंच, देवस्थानांचे पदाधिकारी, जलदूत, जलप्रेमी आणि ग्रामस्थ परिषदेला उपस्थित होते. यावेळी विविध गावांच्या प्रतिनिधींनी स्थानिक पाणीसमस्या आणि जलसंधारणासंदर्भातील अनुभव मांडले.
परिषदेत ‘सप्तलिंगी नदी परिषद समन्वय समिती’ पाच सदस्यांची स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. नदीकाठावरील १९ गावांसह संपूर्ण सप्तलिंगी पाणलोट क्षेत्रातील सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येक गावात पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समित्यांच्या माध्यमातून गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामांना चालना देण्याचे नियोजन आहे.
सप्तलिंगी नदीकाठावरील ज्या गावांना वनराई बंधारे उभारायचे आहेत, त्यांनी तातडीने सप्तलिंगी नदी परिषदेकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच नदीवरील शिवलिंग देवस्थानांमध्ये पूजेसाठी पाणी उपलब्ध व्हावे आणि गावांमधील पाणीसाठा वाढावा, यासाठी आवश्यकतेनुसार जलतारा खड्डे तयार करण्याचे नियोजन करण्यात आले. यासाठी संबंधित ग्रामपंचायतीने अधिकृत लेटरहेडवर मागणीपत्र किंवा प्रस्ताव सादर करावा. परिषदेत मांडलेल्या नियोजनानुसार, २४ तासांत मंजुरी मिळवून काम सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
मार्लेश्वर देवस्थान, मारळ यांच्या मागणीनुसार शुक्रवार, ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता देवस्थानाच्या पायथ्याशी, पार्किंगजवळील नदीपात्रात बंधारा उभारणीचे काम सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले. कुडवली येथे बंधारा उभारण्याच्या मागणीच्या अनुषंगाने वनविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संबंधित जागेची प्रत्यक्ष पाहणी करून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
जलसंधारणाच्या व्यापक नियोजनासाठी प्रत्येक गावातील नैसर्गिक जलस्रोत, दुर्लक्षित विहिरी आणि तळी शोधून त्यांची माहिती परिषदेकडे सादर करण्याचे ठरले. तसेच ग्रामपंचायत, ग्रामदैवत देवस्थान, शिवलिंग देवस्थानांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांना एकत्र आणून गावपातळीवर बैठका घेण्यात येणार आहेत. या बैठकांमधून प्रत्येक गावाचा स्वतंत्र जलसंधारण कृती आराखडा तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे.
परिषदेदरम्यान उजगाव येथील शेतकऱ्यांनी आणलेल्या यंदाच्या सप्तलिंगी लाल भाताचे मान्यवरांच्या हस्ते मुहूर्तपूजन करण्यात आले.
क्रांती व्यापारीतर्फे सूत्रसंचालन सुरेंद्र ऊर्फ भाऊ शिंदे यांनी केले. परिषदेचे अध्यक्ष निखिल कोळवणकर यांनी मनोगत व्यक्त करून आभार मानले. सप्तलिंगी नदीचे संवर्धन, धार्मिक पर्यटनाचा विकास आणि जलसंधारणाच्या माध्यमातून संभाव्य दुष्काळाचा सामना करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.
परिषदेच्या आयोजनासाठी सभागृह आणि चहाची व्यवस्था केल्याबद्दल बारक्याशेठ बने यांचे आभार मानण्यात आले. सचिव अण्णा बेर्डे, सहसचिव संदीप वेल्हाळ, आकाश भोपळे, प्रभाकर मांगले आणि साई कामेरकर यांनी आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली.
गावागावांत जलसंधारणाची प्रत्यक्ष कामे उभी करून सप्तलिंगी नदीचे पुनरुज्जीवन साध्य करणे आणि एकजुटीने संभाव्य दुष्काळावर मात करणे, असा निर्धार व्यक्त करत तिसरी सप्तलिंगी नदी परिषद संपन्न झाली.


