(मुंबई)
राज्यात वेळेपूर्वी दाखल झालेल्या मान्सूनने सुरुवातीला दमदार हजेरी लावली असली, तरी नंतर पावसाने घेतलेली विश्रांती शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. मे महिन्यात झालेल्या सुरुवातीच्या पावसानंतर जून आणि जुलैमध्ये मोठ्या प्रमाणात खंड पडल्याने पेरण्या अर्धवट अवस्थेतच अडकल्या आहेत. त्यामुळे आधीच संकटात असलेला शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडला आहे.
हवामान विभागाने नुकताच दिलेला नवा अंदाजही शेतकऱ्यांच्या चिंता अधिकच वाढवणारा आहे. मराठवाड्यात सध्या पावसासाठी अनुकूल वातावरण नसल्याचं स्पष्ट करताना विभागाने काही ठिकाणी तुरळक आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.
दरम्यान, पुणे शहर आणि त्याच्या आजूबाजूच्या भागांमध्येही सध्या जोरदार पावसाची शक्यता नसल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. मात्र, २० जुलैनंतर या भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मराठवाड्यात मात्र पावसाचं प्रमाण तुलनेने खूपच कमी आहे. अनेक भागांमध्ये पिके सुकण्याची स्थिती असून, वेळेत पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी आता समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत, मात्र हवामान खात्याच्या अंदाजामुळे त्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

