(मुंबई)
राज्यात जमिनींचे अनधिकृत तुकडे पाडण्याच्या आणि त्यांचे नियमितीकरण करण्याच्या प्रक्रियेत सातत्याने अडथळे येत असल्याने, ‘महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व एकत्रीकरण अधिनियम, 1947’ मध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. महसूल व वन विभागाने यासंदर्भात अधिकृत शासन निर्णय जारी केला आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे शेतजमिनींचे अनधिकृत तुकडे होण्यास अडथळा निर्माण झाला असला, तरी त्यातून अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना व्यवहारात अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या कायद्यातील कलम 8ब व 9(3) अन्वये नियमितीकरणाची प्रक्रिया सुलभ करण्यावर समिती लक्ष केंद्रित करणार आहे.
समितीचे प्रमुख उद्दिष्ट
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पावसाळी अधिवेशनात यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, अपर मुख्य सचिव (महसूल) यांच्या अध्यक्षतेखालील समिती १५ दिवसांत शासनास शिफारसींचा अहवाल सादर करणार आहे. या समितीत विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी तसेच तज्ज्ञ सदस्यांचा समावेश आहे.
समितीचे कार्य:
-
नागरी क्षेत्र वगळल्याने जमिनीच्या हस्तांतरणात अडथळा निर्माण होतो, त्यामुळे त्यासाठी नियोजनबद्ध कार्यपद्धती ठरवणे.
-
कलम 8 ब अन्वये तुकड्यांचे नियमितीकरण सुलभ आणि व्यवहार्य कसे करता येईल, याबाबत प्रस्ताव तयार करणे.
-
कलम 9 (3) अन्वये नियमितीकरणासाठी एकसंध कार्यपद्धती निश्चित करणे.
-
नोंदणीकृत दस्तऐवजांवर आधारित तुकड्यांचे नियमितीकरण आणि त्यांची नोंद अधिकार अभिलेखात घेण्यासाठी मानक कार्यपद्धती ठरवणे.
-
अनोंदणीकृत खरेदी व्यवहार नियमित करण्यासाठी आवश्यक असल्यास कायद्यात बदल सुचवणे.
-
अशा व्यवहारांसाठी विशेष मोहिम राबवण्याचा आराखडा तयार करणे.
-
नंतरच्या नोंदणी व अभिलेखन प्रक्रियेचा स्पष्ट आराखडा तयार करणे.
या सुधारणा आणि स्पष्ट कार्यपद्धतीमुळे राज्यातील हजारो जमिनीचे अनधिकृत तुकडे कायदेशीर होतील, जमीन नोंदणी प्रक्रिया पारदर्शक बनेल आणि नागरिकांना वारंवार महसूल खात्याकडे फेरफारांसाठी हेलपाटे मारावे लागणार नाहीत. तसेच, शेतकऱ्यांना कर्ज, अनुदान व अन्य सरकारी योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ होईल.
अधिवेशनाच्या कालावधीतच या विषयावर अध्यादेश काढण्याची शक्यता महसूल मंत्री बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे 1947 पासून प्रलंबित असलेल्या जमिनीच्या तुकड्यांविषयीच्या प्रश्नावर आता संधीच्या रूपात मार्ग मोकळा होण्याची चिन्हं आहेत.