(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना चालू आर्थिक वर्षात घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचं तब्बल ८५ कोटी ३७ लाख रुपयांचं उद्दिष्ट गाठावे लागणार आहे. मार्च २०२६ पर्यंत ही वसुली पूर्ण करण्याचं मोठे आव्हान जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागासमोर आहे. या उद्दिष्टपूर्तीनंतरच जिल्हा शंभर टक्के करवसुलीकडे वाटचाल करु शकणार आहे. मात्र, तीन महिन्यांनंतर केवळ ८ टक्क्यांपर्यंतच वसुली झाल्याची माहिती समोर आली आहे.
ग्रामपंचायत विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतींना घरपट्टीच्या माध्यमातून ६२ कोटी ५६ लाख रुपयांची वसुली करायची आहे. मात्र, जूनअखेर केवळ ७.१८ टक्केच वसुली झालेली आहे. यामध्ये सर्वाधिक वसुली रत्नागिरी तालुक्याने नोंदवली असून, येथे १३.२ टक्के वसुली झाली आहे. दुसरीकडे खेड तालुक्याची स्थिती चिंताजनक असून, केवळ २.६ टक्केच वसुली झाली आहे. पाणीपट्टीच्या वसुलीचा आढावा घेतला असता, जिल्हाभरात केवळ ७.८४ टक्केच वसुली झालेली आहे. अजूनही २२ कोटी ८१ लाख २३ हजार रुपयांची वसुली बाकी आहे. यात दापोली तालुक्याने आघाडी घेतली असून, १८.५६ टक्के वसुलीची नोंद येथे झाली आहे. खेड तालुक्याने पुन्हा एकदा सगळ्यात कमी म्हणजे केवळ ३.५ टक्केच वसुली केली आहे.
गेल्या आर्थिक वर्षातही मोठ्या प्रमाणात करवसुली शिल्लक राहिल्याने, यंदा ग्रामपंचायतींना अधिक प्रयत्न करून ही रक्कम वसूल करावी लागणार आहे. यासाठी ग्रामपंचायत सचिवांपासून ते गटविकास अधिकाऱ्यांपर्यंत सर्व यंत्रणेला सक्रियपणे काम करावे लागणार आहे. रत्नागिरी ग्रामपंचायत विभागाचे प्रमुख राहुल देसाई यांनी १०० टक्के वसुलीचे लक्ष ठेवले असून, यासाठी विविध उपाययोजना आखण्याचे संकेत दिले आहेत.
कर भरणे ही नागरिकांची जबाबदारी असली, तरी प्रशासनानेही जनजागृती, सवलती आणि सक्ती यांचा समन्वय साधून वसुलीच्या दिशेने ठोस पावले उचलावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.