(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील कासारवेली येथे किरकोळ कारणावरून दोन तरुणांनी एकास शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली. विशेष म्हणजे, या हल्ल्यात लोखंडी सळीचा वापर करून तरुणाच्या डोक्यात गंभीर दुखापत करण्यात आली. रविवार, १३ जुलै रोजी रात्री ११.३० वाजता ही घटना घडली.
या प्रकरणी गौरव संतोष शिंदे (वय ३२, रा. नार्वेकर कॉम्प्लेक्स, गाडीतळ, रत्नागिरी) यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अक्षय माने (रा. गवळीवाडा, रत्नागिरी) आणि सिद्धार्थ विठ्ठल लाकडे (रा. कासारवेली, रत्नागिरी) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी गौरव शिंदे हे त्या दिवशी रात्री कासारवेली येथील सासुरवाडीत जेवणासाठी गेले होते. जेवणानंतर ते बाहेर सिगारेट ओढत उभे असताना अक्षय माने व सिद्धार्थ लाकडे हे दोघे त्याठिकाणी आले. त्यावेळी अक्षय माने याने “तू इथे उभा का?” असे विचारून वादास सुरुवात केली. फिर्यादीने “मी सिगारेट ओढत आहे” असे सांगितल्यावर अक्षयने शिवीगाळ करत त्यास मारहाण केली. यानंतर सिद्धार्थ लाकडे यानेही हाताने मारहाण करत लोखंडी सळीने डोक्यात मारली. या हल्ल्यात गौरव शिंदे जखमी झाले असून, त्यांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. “मी तुला बघून घेईन,” अशी धमकीही या संशयित आरोपींनी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
शहर पोलिसांनी या प्रकरणी दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. मात्र किरकोळ वादांमधून वाढत्या हिंसाचाराच्या घटनांनी शहरात पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे.

