(रत्नागिरी)
वंचित बहुजन आघाडीचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकास ऊर्फ अण्णा जाधव यांच्यावर नरवण (ता. गुहागर) येथे एका हॉटेलमध्ये दुपारी दीड वाजता धारदार शस्त्राने हल्ला झाला आहे. यामध्ये त्यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली असून, बारा टाके पडले आहेत. राजकीय वैमनस्यातून हा हल्ला झाला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
विकास जाधव यांचे मूळगाव डोळवली असून, सध्या ते गुढे फाटा चिपळूण येथे राहतात. नरवण येथील सुनील मोरे यांच्या हॉटेलला दुपारी आले असता तीन मारेकऱ्यांनी हॉटेलसमोरील गाडीच्या काचा फोडल्या व त्यानंतर जाधव यांच्यावर सुऱ्याने हल्ला केला. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार त्यांच्या हातावर जबरी वार झाला असून, त्याला बारा टाके पडले आहेत तसेच पाठीवरही जखम झाली आहे. विकास जाधव यांच्यावर झालेला हल्ल्याची बातमी समजताच विविध राजकीय पक्ष, तसेच त्यांच्या समाजातील लोकांनी गुहागर ग्रामीण रुग्णालय येथे मोठी गर्दी केली. गुहागर विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासात पहिल्यांदाच निवडणुकीदरम्यान असा जीवघेणा हल्ला झाला असून, त्याचा सर्व राजकीय पक्षांकडून निषेध केला जात आहे.
बौद्धजन संघाचे अध्यक्ष सुरेश सावंत यांनी पोलिसांना जाब विचारला. निवडणूक काळात सर्वांच्या गाड्यांमधील फक्त नोटाच तपासल्या जातात का, गाडीमधून आलेली हत्यारे तुम्हाला दिसत नाहीत का, असा प्रश्न त्यांनी पोलिसांना केला. अशा पद्धतीने दहशत निर्माण करून आमच्या लोकांना घरी बसवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर त्यांचा तो गैरसमज आहे. उलट आता सर्व जण जास्त ताकदीने उतरतील, असे ते म्हणाले. चिपळूण तालुक्यातील कळंबट येथे झालेल्या प्रकरणात अण्णा जाधव यांनी आक्रमक भूमिका घेतली, त्यांनी तो विषय उचलून धरला म्हणून हल्ला झाला असेल तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराही सावंत यांनी दिला.
….तर पोलीस यंत्रणा काय करतेय?
आमचे उत्तर जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांच्यावर जीवघेण्या हल्ल्याचा निषेध करतो. असे भ्याड हल्ले आदर्श आचासंहितेत होत असतील तर पोलीस यंत्रणा काय करतेय? ज्यांनी बौद्ध समाजाबद्दल अपमानित करणारे वक्तव्य केले त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली नाही. मात्र कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची तत्परता पोलिसांनी दाखवली. आता हल्लेखोरांना तत्काळ अटक करनार आहात की नाही? की तिथेही पोलीस यंत्रणा दबावाला बळी पडणार? असा खडा सवाल रत्नागिरी महासचिव मुकुंद सावंत यांनी उपस्थित केला आहे.