(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मिऱ्या-नागपूर महामार्गावर छोट्या-मोठ्या अपघाताची मालिका सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. हातखंबा तिठा येथे दोन्ही महामार्गाचे काम येऊन ठेपले आहे. याच ठिकाणी ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे रविवारी दुपारच्या सुमारास एका महिलेचा या भागात अपघात होऊन जागीच ठार झाल्याची दुर्देवी घटना घडली. दुचाकीवरून पती पत्नी असे दोघेही रत्नागिरीच्या दिशेने जात होते. यावेळी अचानक यातील दुचाकी चालक पतीचा तोल गेल्याने दोघेही रस्त्यावर पडले. यावेळी त्यांच्या मागून आलेल्या ट्रकने महिलेला चिरडले. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची ही घटना रविवार, 16 रोजी दुपारी 2.30 च्या सुमारास घडली.
तैसिरा अमीन हिसब (वय 26, मूळ रा. मुंबई, सध्या रा. वडवली लांजा, रत्नागिरी) असे अपघातात मृत्यू झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. अमिन हिसब आणि तैसिरा यांचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. हिसब दाम्पत्य मुंबईला रहात होते. काही दिवसांपूर्वी हे दाम्पत्य आपल्या गावी वडवली येथे आले होते. रविवारी दुपारी अमिन हा पत्नी तैसिराला आपल्या ताब्यातील दुचाकीवरुन लांजा ते रत्नागिरी असा घेवून येत होता. त्यांची दुचाकी हातखंबा तिठा येथून जात असताना त्यांच्या दुचाकीच्या पाठीमागून एक ट्रक येत होता. याचवेळी हा ट्रक या दुचाकीच्या जवळ आल्याने अमिनचा तेथील रस्त्याच्या कामामुळे दुचाकीवरील ताबा सुटून दोघेही रस्त्यावर कोसळले.
अपघातानंतर तैसिरा रस्त्यावरुन उठेपर्यंत मागून येणाऱ्या ट्रकची चाके तिच्या हातावरुन गेल्याने ती गंभीर जखमी झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला होता. तेथील ग्रामस्थांनी दोघांनाही रिक्षा टेम्पोने तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी तसेच रुग्णालयात धाव घेत अपघाताचा पंचनामा केला. सायंकाळी उशिरापर्यंत या अपघाताची नोंद करण्याची कार्यवाही सुरु होती.