( देवरूख )
बँक ऑफ बडोदा निवृत्त कर्मचारी संघटना, महाराष्ट्र या संघटनेची २४वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक ९ जुलै २०२५ रोजी पुण्यातील हॉटेल बाम्बू हाऊस, जंगली महाराज रोड, शिवाजीनगर येथे उत्साहात पार पडली.
या सभेला मुंबई, पुणे, नाशिक आणि कोकण परिसरातील शेकडो सभासदांनी उपस्थित राहून सक्रिय सहभाग नोंदवला. संघटनेचे सरचिटणीस सुभाष पुरोहित यांनी २००१ साली अवघ्या ३५ सभासदांसह या संघटनेची स्थापना केली होती. आज, तब्बल २४ वर्षांच्या अथक कार्यातून ही संस्था सभासदांच्या हक्कांसाठी लढणारा वटवृक्ष ठरली आहे.
सभेत गेल्या दोन दशकांतील संघटनेच्या कार्याचा आढावा घेण्यात आला..विशेषतः पेन्शनमधील सुसूत्रता, समूह वैद्यकीय विमा योजना, विमा हप्ता सवलत, कॅशलेस सेवा, पर्यायी विमा योजना (मूळ व अधिकतम पॉलिसी), तसेच रुग्णालय बील प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
संघटनेच्या प्रयत्नातून निवृत्त कर्मचाऱ्यांना बँकेच्या हॉलिडे होमचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. तसेच ७० वर्षे पूर्ण झालेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांना दर पाच वर्षांनी ₹३०००/- ची अतिरिक्त आर्थिक मदत मिळावी यासाठी संघटनेने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून त्याचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. संघटनेच्या कार्याबद्दल सर्व सभासदांनी समाधान व्यक्त करून कौतुकाची थाप दिली.
या संघटनेचा संबंध अखिल भारतीय बँक ऑफ बडोदा निवृत्त कर्मचारी संघटना (AIBRF) शी असून ती राष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहे. AIBRF च्या प्रयत्नांतून २०१० साली काही कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळवून देण्यात आला. त्यानंतर २०२४ मध्ये राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांनाही पेन्शन योजनेचा लाभ मिळाला आहे.
१९८६ पासून पेन्शन वाढ किंवा संरचनेत कोणताही बदल झालेला नाही. केंद्र, राज्य सरकार आणि रिझर्व्ह बँकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या लाभाप्रमाणेच आम्हालाही समान हक्क मिळावा यासाठी संघटना सातत्याने आंदोलने, निवेदने आणि भेटीद्वारे केंद्र सरकार, लोकप्रतिनिधी व संबंधित विभागांचे लक्ष वेधत आहे.
“पेन्शन वृद्धी हा आमचा न्यायहक्क असून तो मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार,” असे ठाम प्रतिपादन सरचिटणीस सुभाष पुरोहित यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. सभेचे वातावरण सौहार्दपूर्ण आणि खेळीमेळीचे होते.