(रत्नागिरी)
शहरातील नाचणे रस्त्यावर दैवज्ञ भवनजवळ असलेल्या श्रीयश अपार्टमेंटमध्ये भरदिवसा घरफोडी झाली असून, अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप उचकटून सुमारे 1 लाख 26 हजार 700 रुपयांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर हात साफ केल्याची घटना गुरुवारी (11 जुलै) दुपारी घडली. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सचिन ज्ञानेश्वर टेकाळे (वय 44, रा. रूम नं. 201, श्रीयश 01, दैवज्ञ भवनजवळ, नाचणे रोड, रत्नागिरी) हे आपल्या घराबाहेर गेले असताना दुपारी 12 ते 12.30 या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप व कडी उचकटवून अनधिकृतपणे घरात प्रवेश केला. घरातील कपाट उघडून त्यामधील लॉकरमधून चोरट्याने विविध सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले.
चोरीस गेलेल्या ऐवजांमध्ये 80,000 रुपये किमतीचे काळ्या आणि सोन्याच्या मण्यांचे मंगळसूत्र, 20,000 रुपयांची 5.5 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, 4,000 रुपये किमतीची 1 ग्रॅम वजनाची गळ्यातील दोन पाने, 4,800 रुपये किमतीची 1.4 ग्रॅम वजनाची सोन्याची दागिने, 12,000 रुपयांची 3 ग्रॅम वजनाची सोन्याची रिंग, 400 रुपये किमतीची 150 मिली वजनाची सोन्याची नाकफली, 3,000 रुपये किमतीच्या 50 ग्रॅम वजनाच्या तीन चांदीच्या चैन्या, 1,500 रुपयांचे 14 ग्रॅम वजनाचे चांदीचे पैंजण आणि 1,000 रुपयांच्या 9 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या तीन अंगठ्यांचा समावेश आहे.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 अंतर्गत कलम 305(अ) आणि 331(3) नुसार गुन्हा नोंदवून अज्ञात चोरट्याचा शोध सुरू केला आहे. घरफोडीच्या घटनांमुळे शहरात भीतीचे वातावरण असून, पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे.