(खेड)
खेड तालुका बौद्ध सेवा संघ, मौजे बोरघर शाखा क्रमांक ३८ चे माजी उपाध्यक्ष तसेच भिमशक्ती क्रिकेट क्लब, बोरघरचे मार्गदर्शक (कोच) मंगेश पवार यांचे सुपुत्र कु. यश मंगेश पवार याची महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पर्व–५ च्या अंडर–१९ गटासाठी सातारा येथे झालेल्या निवड चाचणीतून थेट महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट संघात निवड झाली आहे.
या निवड चाचणीत राज्यभरातून आलेल्या अनेक गुणवंत खेळाडूंमध्ये यशने आपल्या मेहनती, शिस्तबद्ध सराव आणि उत्कृष्ट खेळाच्या जोरावर निवड समितीचे लक्ष वेधून घेतले. सातत्यपूर्ण कामगिरी, आत्मविश्वास आणि संघभावना या गुणांच्या जोरावर त्याने ही मोठी संधी मिळवली असून, ही निवड बोरघर गावासह संपूर्ण खेड तालुक्यासाठी अभिमानास्पद ठरली आहे.
यशच्या या यशामागे त्याचे कुटुंबीय, विशेषतः वडील आयु. मंगेश पवार यांचे मार्गदर्शन, तसेच भिमशक्ती क्रिकेट क्लबमधील प्रशिक्षक, सहकारी खेळाडू आणि शुभेच्छुकांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. कठोर परिश्रम, नियमित सराव आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळेच यश आज राज्य पातळीवर पोहोचला आहे, असे क्रीडाप्रेमींमध्ये बोलले जात आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल संपूर्ण पवार परिवार, भिमशक्ती क्रिकेट क्लब बोरघर तसेच ग्रामस्थांच्या वतीने कु. यश मंगेश पवार याचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, पुढील स्पर्धांसाठी त्याला उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत.

