(चिपळूण)
शहरानजीकच्या वालोपे नदीकिनारी गावठी हातभट्टीवर येथील पोलिसांनी धाड टाकत १ लाख ८२ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. गेल्या आठवड्याभरापूर्वी देखील या परिसरात गावठी हातभट्टीवर धाड टाकले असल्याचे समोर आले होते. यामुळे वालोपे परिसरामध्ये गावठी हातभट्ट्या सुरू असल्याचे समोर येत आहे.
याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल बाळू रमेश पालकर (वय ४५ वर्ष ) यांनी येथील पोलीस ठाण्यात दिली आहे. यानुसार मंदार मधुकर दिवेकर (वय ३० वर्षे, रा. भिले- भोईवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
वालोपे नदीकिनारी शुक्रवार दिनांक २१ रोजी दुपारी हातभट्टीवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईत १ लाख ८२ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये आठ हजार रुपये किमतीचे १५० लिटर गरम गूळ नवसागर मिश्रित कुजके रसायन, ६२ हजार ५०० रुपये किमतीचे १२०० लिटर गुळ व नवसागर मिश्रित तयार केलेले कुजके रसायन, ५ हजार रुपये किमतीची एक गोलाकार आकाराची ॲल्युमिनियमची डेग, ५०० रुपये किमतीचा एक स्टीलचा चटू, २ हजार २०० रुपये किमतीची २० लिटर गावठी हातभट्टीची दारू आणि १ लाख ४ हजार रुपये किमतीचे २ हजार लिटर गूळ व नवसागर मिश्रित तयार केलेले कुजके रसायन असा या मुद्देमालाचा समावेश आहे.
पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईबाबत सर्वत्र कौतुक होत आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले, पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलिसांच्या पथकाने ही धडक कारवाई केली आहे.

