(संगमेश्वर)
तालुक्यातील देवरूख नजीकच्या साडवली सप्तलिंगीनगर परिसरात सोमवारी सकाळी आणखी दोन बंद घरे चोरट्यांनी फोडल्याची घटना उघड झाली आहे. या चोरीच्या प्रयत्नात चोरट्यांच्या हाती काहीही लागले नसले तरी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, तीन संशयित चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाले आहेत.
गावातील राजाराम घाग यांच्या घराजवळ गराटे आणि महाजन हे भाडेकरू राहतात. सुट्टीच्या निमित्ताने दोघेही आपल्या मूळ गावी गेले होते. सोमवारी सकाळी गराटे खोलीवर परतल्यानंतर दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसून आले. तपासणीअंती घरातील साहित्याची उचापत झाल्याचे निदर्शनास आले. मात्र काहीही चोरीला गेले नसल्याचे गराटे यांनी सांगितले.
दरम्यान, महाजन यांच्या घराचेही कुलूप गायब झाले होते. मात्र ते सोमवारी खोलीवर न आल्याने त्यांच्या घरातून काही चोरीला गेले आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
याच परिसरातील सुजित जाधव यांच्या दुचाकीची नंबर प्लेट चोरट्यांनी नेली होती. आश्चर्य म्हणजे ही नंबर प्लेट पुढे महाजन यांच्या दारासमोर सापडली. तसेच गराटे यांच्या दुचाकीची नंबर प्लेटही उचकटल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, तीन संशयितांचा शोध सुरू आहे.

