(रत्नागिरी /प्रतिनिधी)
राज्यातील नाट्यरसिकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या ६४ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचा बिगुल अखेर वाजला असून, यंदा या प्रतिष्ठेच्या महाअंतिम सोहळ्याचे यजमानपद रत्नागिरी शहराला लाभले आहे. शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ही स्पर्धा येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहात २ ते २८ फेब्रुवारीदरम्यान रंगणार असून, राज्याच्या कानाकोपऱ्यातून निवडलेल्या ४७ नामवंत नाट्यसंस्था या अंतिम फेरीत आपले सशक्त सादरीकरण करणार आहेत.
फेब्रुवारी महिन्याच्या २ तारखेला दादरच्या ‘रेशनकार्ड’ या नाटकाने स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे. त्यानंतर अमरावतीचे ‘वारकरी’, परभणीचे ‘संपूर्ण’, जालना येथील ‘टेक अ चान्स’, नाशिकचे ‘प्रतिषिद्ध’ आणि सांगलीच्या ‘युटोपिया’ यांसारखी एकाहून एक सरस नाटके रंगमंचावर अवतरतील. पुणे, नागपूर, कोल्हापूर, इचलकरंजी, चंद्रपूर, लातूर, बोईसर, इंदूर तसेच पणजी आदी ठिकाणांहून आलेल्या नाट्यसंस्थांचा सहभाग या स्पर्धेला व्यापक राज्यस्तरीय स्वरूप देणारा ठरणार आहे.
या नाट्यमहोत्सवाचे आयोजन दोन सत्रांत करण्यात आले असून, दररोज सकाळी ११.३० आणि सायंकाळी ७.३० वाजता नाटकांचे प्रयोग होणार आहेत. मात्र ७, ८, १३, १४ आणि २८ फेब्रुवारी रोजी केवळ सकाळच्या सत्रात, तर २१ फेब्रुवारीला फक्त सायंकाळी प्रयोग होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्थानिक आणि कोकणी मातीतील नाट्यकृतींचा समावेश. रत्नागिरीची ‘अग्नीपंख’ आणि लांजाची ‘ईठ्ठला’ ही नाटके, तसेच आचऱ्याचे ‘वाट चुकलो देव’ आणि सिंधुदुर्गचे ‘सूनबाई तोयात’ ही नाट्यकृती सादर होणार असल्याने स्थानिक रसिकांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. याशिवाय ‘द हिंदू लेडी’, ‘वामन आख्यान’, ‘राहिले दूर घर माझे’, ‘रणमर्द’, ‘दशानन’, ‘झेंडा रोविला’ आणि ‘द लास्ट सेल’ यांसारखी आशयवैविध्याने नटलेली नाटके या महिनाभर चालणाऱ्या नाट्यजागराचा भाग असणार आहेत.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाने या अंतिम फेरीसाठी जय्यत तयारी केली असून, रत्नागिरीकर नाट्यप्रेमींनी या दर्जेदार आणि वैचारिक नाट्यसादरीकरणाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

