(राजापूर / तुषार पाचलकर)
प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालय पाचल येथे व्हावे की रायपाटण येथे, यावर सध्या राजापूर तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पाचलमध्ये अप्पर तहसील कार्यालय व्हावे, या मागणीला आता तरुण वर्गाचाही मोठा पाठिंबा मिळू लागला आहे. श्रीराम सेवक मंडळ, पाचलचे अध्यक्ष मंगेश कुडतरकर यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडत, “वेळ आलीच तर लोकशाही मार्गाने आंदोलन करू, पण अप्पर तहसील कार्यालय पाचलमध्येच आणू,” असा ठाम इशारा दिला आहे.
कुडतरकर म्हणाले की, पाचल पंचक्रोशीतील तरुण वर्ग विकासाच्या या लढ्यात पूर्ण ताकदीने गावाच्या पाठीशी उभा आहे. अप्पर तहसील कार्यालय हा केवळ एक शासकीय कार्यालयाचा विषय नसून, संपूर्ण पंचक्रोशीच्या सर्वांगीण विकासाशी निगडित महत्त्वाचा प्रश्न आहे. या कार्यालयामुळे प्रशासन लोकांच्या अधिक जवळ येईल आणि नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी होणारी धावपळ कमी होईल.
त्यांनी सांगितले की, अप्पर तहसील कार्यालय स्थापन झाल्यास परिसरात विविध शासकीय आणि खासगी कार्यालये, सेवा केंद्रे, बँका, व्यावसायिक आस्थापना तसेच पूरक उद्योग उभारण्यास चालना मिळेल. त्यामुळे स्थानिक युवक-युवतींसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहार वाढतील आणि स्थानिक व्यवसायालाही मोठी गती मिळेल.
कुडतरकर यांच्या मते, या कार्यालयामुळे पाचलसह परिसरातील रस्ते, वाहतूक व्यवस्था, दळणवळण, शासकीय सेवा आणि व्यापारी व्यवहार अधिक सक्षम होतील. परिणामी संपूर्ण पंचक्रोशीच्या विकासाला नवे बळ मिळेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळेल.
इतिहासाचे दाखले देत काही जण वेगवेगळे दावे करत असल्याचा उल्लेख करत त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “काही जण इतिहास सांगत आहेत. मात्र जनतेचा ठाम निर्णय आणि तरुणांची एकजूट यामुळे नवीन इतिहास घडेल. इतिहास केवळ सांगण्यासाठी नसतो, तर योग्य वेळी जनतेच्या एकीच्या बळावर तो घडवण्यासाठी असतो.”
ते पुढे म्हणाले की, पाचलच्या मागे उभा असलेला तरुण वर्ग केवळ भावना व्यक्त करत नाही, तर विकासासाठी लोकशाही मार्गाने संघर्ष करण्यासही पूर्णपणे तयार आहे. कायद्याचा सन्मान राखत आपल्या हक्कासाठी लढण्याची तयारी प्रत्येक तरुणाची असल्याचे त्यांनी नमूद केले.
पंचक्रोशीचे श्रद्धास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीही प्रशासनिक बळ आणि विकासाच्या नव्या संधी आवश्यक असल्याचे कुडतरकर यांनी सांगितले. अप्पर तहसील कार्यालयामुळे भविष्यात अधिक शासकीय सुविधा, पायाभूत विकासकामे आणि विविध प्रकल्प या भागात येण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शेवटी त्यांनी नागरिकांना एकजुटीचे आवाहन करत म्हटले, “अप्पर तहसील कार्यालय पाचलमध्येच व्हावे, ही केवळ एका गावाची मागणी नाही. हा संपूर्ण पंचक्रोशीच्या भविष्यातील विकास, रोजगार, प्रशासन आणि जनसुविधांचा प्रश्न आहे. जनतेची एकजूट आणि तरुणांची ताकद याच्या बळावर हा लढा निश्चित यशस्वी होईल.”

