(राजापूर / तुषार पाचलकर )
राजापूर तालुक्यातील मिळंद सावडाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच किर्ती योगेश आयरे यांची राज्यस्तरीय ‘आदर्श सरपंच सन्मान २०२६’ साठी निवड करण्यात आली आहे. स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र यांच्या वतीने हा सन्मान दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सरपंचांना दिला जातो.
किर्ती आयरे यांनी आपल्या कार्यकाळात ग्रामविकासासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे तसेच समाजहिताच्या विविध उपक्रमांमुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत संघटनेने हा सन्मान जाहीर केला आहे.
हा पुरस्कार सोहळा रविवारी, ५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता माऊली संकुल सभागृह, सावेडी रोड, अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यास विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार असून सरपंच सेवा संघाचे समर्थक बाबासाहेब पावसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील, ग्रामसेवक नेते एकनाथराव ढाकणे यांच्यासह दिग्गज मान्यवरांच्या शुभहस्ते व बाबासाहेब पावसे पाटील, रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.
सरपंच कीर्ती आयरे यांच्या कार्यकाळात यंदा ग्रामपंचायतीची घरपट्टी आणि पाणीपट्टी शंभर टक्के वसूल करण्यात यश मिळाले आहे. ग्रुप ग्रामपंचायत मिळंद–सावडाव येथे कर वसुलीचा हा टप्पा पूर्ण झाल्याने प्रशासनाची कार्यक्षमता अधोरेखित झाली आहे.
फेब्रुवारी २०२१ मध्ये त्यांनी सरपंच पदाचा कार्यभार स्वीकारताना मोठ्या प्रमाणावर घरपट्टी व पाणीपट्टी थकीत होती. मात्र, गेल्या पाच वर्षांत नियोजनबद्ध पाठपुरावा, जनजागृती आणि प्रशासनाच्या समन्वयातून सर्व थकीत कर वसूल करण्यात यश आले आहे. या यशामध्ये ग्रामपंचायत अधिकारी, शिपाई, पाणीपुरवठा कर्मचारी तसेच ग्रामपंचायत सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून, सामूहिक प्रयत्नांमुळेच शंभर टक्के कर वसुलीचा मानाचा टप्पा गाठता आला, असे किर्ती आयरे यांनी म्हटले आहे.
‘आदर्श सरपंच’ पुरस्कारासाठी त्यांची निवड झाल्याने राजापूर तालुक्यासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक पातळीवर प्रभावी कामगिरी करत ग्रामीण विकासाला चालना देणाऱ्या किर्ती आयरे यांच्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेतली गेल्याने तालुक्याची मान उंचावली आहे. त्यांच्या या यशामुळे इतर सरपंच आणि सामाजिक कार्यकर्त्यांनाही प्रेरणा मिळणार असून, ग्रामविकासासाठी अधिक जोमाने काम करण्याची ऊर्जा निर्माण झाली आहे. नागरिक, ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

