(नाणीज)
नाणीजक्षेत्री आज भक्ती आणि शक्तीचा जणू मळाच फुलल्याचे दृश्य दिसून आले. एकीकडे पावसाच्या सरी, तर दुसरीकडे लाखो भाविकांच्या गर्दीचा महापूर अशा निसर्गरम्य वातावरणात गुरुपौर्णिमा उत्सव चैतन्याच्या उत्साहात पार पडला. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पूजनासाठी लाखो भाविक सुंदरगडावर एकत्र जमले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर श्रद्धा, समाधान आणि गुरुभक्तीचे तेज झळकत होते.
सुंदरगडावर पहाटेपासूनच भक्तांची गर्दी
आज पहाटेपासूनच सुंदरगड परिसर भाविकांच्या गजराने जागा झाला होता. महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, गोवा, छत्तीसगड आदी राज्यांतून आलेले भक्त सकाळी सहाच्या सुमारास पूजनासाठी सज्ज झाले होते. त्यांनी पूजेचे साहित्य, गुरूंची प्रतिमा घेऊन आपापली जागा घेतली होती.
साडेआठ वाजता गुरूपूजनाचा कार्यक्रम सुरू होण्याआधीच जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांचे आगमन होताच गडावर जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला. त्यांनी प्रथम संतशिरोमणी गजानन महाराज मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर संतपीठावर आले असता, सुवासिनींनी त्यांचे औक्षण केले आणि टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत झाले. त्यांनी हात उंचावत सर्वांना आशीर्वाद दिला. या वेळी इचलकरंजी येथील सौ. आणि श्री. कुमार चव्हाण या जोडप्याला संतपीठावर पूजेचा मान लाभला. पूजन सोहळ्याचे मार्गदर्शन वे.शा.सं. भालचंद्रशास्त्री शौचे गुरूजी यांनी केले.
एकाच वेळी सामूहिक पूजनाचा अद्वितीय अनुभव
संतपीठावरून गुरूजी पूजाविधी सांगत होते आणि उपस्थित भाविक त्यानुसार एकाच वेळी पूजन करत होते. हळद-कुंकू वाहणे, फुले अर्पण करणे, निरांजन प्रज्वलित करणे, औक्षण आणि घंटानाद – हे सर्व विधी एकाच वेळी पार पडत असल्यामुळे संपूर्ण सुंदरगड चैतन्याने भरून गेला होता. दुपारी साडेबारापर्यंत पूजाविधी सुरु होता. गर्दी इतकी होती की पाय ठेवायलाही जागा नव्हती.
गुरुपरिवाराची उपस्थिती व आशीर्वचन
या पावन सोहळ्यास प.पू. कानिफनाथ महाराज, सौ. सुप्रियाताई, सौ. ओमेश्वरीताई, देवयोगी आणि सिंदूरअंबिका या गुरुपरिवारातील मान्यवरांची उपस्थिती होती. पूजेनंतर जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज म्हणाले, “आजची गुरुपौर्णिमा ही सर्वांसाठी एक अध्यात्मिक पर्वणी ठरली आहे. या दिवशीचं पुण्य सर्वांच्या जीवनात आनंद आणि कल्याण घेऊन येवो.”
सप्त चिरंजीव महामृत्यूजय यागाची सांगता आणि चरणदर्शन सोहळा
कालपासून सुरू झालेल्या सप्त चिरंजीव महामृत्यूजय यागाची सांगता आज दुपारी पार पडली. यानंतर सुरू झालेल्या चरणदर्शन सोहळ्यासाठी भाविकांनी मोठ्या श्रद्धेने रांगा लावल्या होत्या. आपल्या गुरूंच्या चरणी नम्र वंदन करण्यासाठी आलेल्या भक्तांमुळे वातावरण भारावून गेले होते. गुरू-शिष्य यांचे हे भावबंध उलगडणारा हा सोहळा दीर्घकाळ स्मरणात राहील असाच होता.