(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यातील वाटद-खंडाळा परिसरात राहणाऱ्या एका २९ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मृत तरुणाचं नाव हीरसिंग मसरसिंग रजपुत असून, तो मूळचा राजस्थान राज्यातील खारा (ता. संचोर, जि. जालोर) येथील रहिवासी होता. तो मागील काही महिन्यांपासून रत्नागिरीत आपल्या मामासोबत राहत होता व हार्डवेअरच्या व्यवसायात त्यांना मदत करत होता.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हीरसिंग याचा दोन वर्षांपूर्वी गावातील एका मुलीसोबत साखरपुडा झाला होता आणि लवकरच लग्नही होणार होतं. मात्र त्याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं, याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
घटनेच्या दिवशी, ८ जुलै रोजी, त्याने मामाला “मी लवकर घरी जातो,” असं सांगून दुकानातून निघाला होता. सायंकाळी साडेसहा-सातच्या सुमारास मामा घरी परतले असता दरवाजा बंद होता आणि आतून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. दरवाजा उघडून आत गेल्यावर हीरसिंग सिलींग फॅनला टॉवेलच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. हे दृश्य पाहून मामांसह शेजाऱ्यांना मोठा धक्का बसला.
तत्काळ त्याला खाली उतरवून प्रा.आरोग्य केंद्र, वाटद-खंडाळा येथे नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं. या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल मंदार मोहिते करीत आहेत.
हीरसिंग याच्या पश्चात वडील, भाऊ, बहीण असा परिवार असून, त्यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावातही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

