साना (येमेन)
येमेनमध्ये एका येमनी नागरिकाच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या भारतीय परिचारिका निमिषा प्रिया हिला १६ जुलै २०२५ रोजी फाशीची शिक्षा दिली जाणार आहे. ही माहिती सामाजिक कार्यकर्ते सॅम्युअल जेरोम बास्करन यांनी दिली असून, त्यांनी संबंधित येमेनी तुरुंग प्रशासनाशी थेट संवाद साधून याची पुष्टी केली आहे.
कोण आहे निमिषा प्रिया?
निमिषा प्रिया ही केरळमधील पलक्कडची रहिवासी असून, ती अनेक वर्षे येमेनमध्ये परिचारिका म्हणून काम करत होती. २०१७ मध्ये तलाल अब्दो मेहदी या येमनी नागरिकाच्या हत्येच्या आरोपाखाली तिला अटक करण्यात आली होती. दोघे मिळून एक क्लिनिक चालवत होते. पण तलालकडून मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून निमिषाने त्याची हत्या केल्याचं चौकशीत निष्पन्न झालं.
या प्रकरणात स्थानिक ट्रायल कोर्टाने निमिषाला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती, जी येमेनच्या सुप्रीम कोर्टानेही कायम ठेवली. २०२३ मध्ये येमेनचे राष्ट्राध्यक्ष रशाद अल-अलीमी यांनीही या शिक्षेवर अंतिम शिक्कामोर्तब केलं. इस्लामिक कायद्यानुसार, खुनाच्या प्रकरणात पीडिताचे कुटुंब आरोपीला माफ करून मृत्युदंड टाळू शकते, यासाठी त्यांना “ब्लड मनी” (रक्तभरपाई) स्वरूपात आर्थिक मोबदला देणे आवश्यक असते.
निमिषाची आई प्रेमा कुमारी, जी सध्या येमेनमध्येच आहे, ती तलालच्या कुटुंबाला ब्लड मनी देऊन माफीनामा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. तथापि, अजूनपर्यंत पीडित कुटुंबाने कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही.

ब्लड मनी म्हणजे काय?
‘ब्लड मनी.’ विशेषत: एखाद्या गुन्ह्यात कोणाचा मृत्यू झाला असेल, तर ‘ब्लड मनी’च्या माध्यमातून त्या व्यक्तीची फाशी रद्द होऊ शकते. प्रत्येक देशात गुन्हेगारीसंदर्भात वेगवेगळे कायदे आहेत. काही ठिकाणी कायदे अतिशय कडक, तर काही ठिकाणी त्यातल्या त्यात मवाळ कायदे आहेत. मानवतेच्या दृष्टिकोनातून अनेक देशांत फाशीची शिक्षा आता रद्द करण्यात आली आहे. तथापि, काही देशांत ही पद्धती अजूनही चालू आहे. त्या-त्या देशाची संस्कृती, परंपरा यांचाही अंमल बऱ्याचदा तिथल्या कायद्यांवर पडलेला दिसतो. संयुक्त अरब अमिरातीसारख्या देशांत काही गंभीर गुन्ह्यांवर सजा माफही केली जाते. त्यातलाच एक नियम आहे ‘ब्लड मनी.’ विशेषत: एखाद्या गुन्ह्यात कोणाचा मृत्यू झाला असेल, तर ‘ब्लड मनी’च्या माध्यमातून त्या व्यक्तीची फाशी रद्द होऊ शकते.
एखाद्याच्या मृत्यूची भरपाई कशानेही करता येत नाही. कारण ती व्यक्ती काही परत येणार नसते. त्यामुळे अपराध्याकडून या गुन्ह्यासाठी भलीमोठी रक्कम घेतली जाते आणि ती पीडित परिवारातील व्यक्तींना दिली जाते. त्यालाच ‘ब्लड मनी’ म्हटले जाते; पण यात सर्वांत महत्त्वाचा नियम म्हणजे या तोडग्याला पीडित व्यक्तीच्या कुटुंबाची मान्यता असली पाहिजे. त्यांनी परवानगी दिली तरच हा पर्याय वापरला जाऊ शकतो.
भारतीय सरकारचा हस्तक्षेप अपेक्षित
सामाजिक कार्यकर्ते सॅम्युअल जेरोम बास्करन म्हणाले, “फाशीची तारीख निश्चित झाली असली तरी पर्याय अजूनही खुले आहेत. भारत सरकारने जर तातडीने हस्तक्षेप केला, तर निमिषाचा जीव वाचण्याची शक्यता आहे.” त्यांनी यापूर्वीही तलालच्या कुटुंबाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांना सकारात्मक उत्तर मिळाले नाही. ते आता पुन्हा एकदा चर्चेसाठी येमेनला जात आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाची भूमिका
या प्रकरणात भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने निमिषा आणि तिच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्ष हस्तक्षेप आणि प्रयत्नांचा वेग आता वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे. १६ जुलै ही तारीख जसजशी जवळ येते आहे, तसतसा निमिषा प्रियाचा जीव वाचवण्यासाठीचे प्रयत्नही केले जात आहेत. ब्लड मनी आणि भारत सरकारचा राजनैतिक हस्तक्षेपच आता तिच्यासाठी एकमेव आशेचा किरण ठरू शकतो. हे प्रकरण केवळ न्यायाचं नव्हे, तर मानवतेच्या आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या कसोटीवरही आहे.

