(मुंबई)
मालवणी भाषेला मराठी रंगभूमीवर आणि पुढे जागतिक पातळीवर वेगळी ओळख देणारे ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर (वय ८६) यांचे सोमवारी (दि. २७ ऑक्टोबर) रात्री १० वाजून ४० मिनिटांनी वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती आणि दहिसर येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन आज (मंगळवारी, दि. २८) सकाळी ९.३० वाजता बोरिवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर पार्थिव त्यांच्या निवासस्थानी – बी/४०१, पारिजात, परबत नगर, एस. व्ही. रोड, दहिसर (पूर्व) येथे नेण्यात येईल. अंतिम संस्कार दहिसरच्या अंबावाडी, दौलतनगर स्मशानभूमीत होणार आहेत.
गवाणकर यांच्या ‘वस्त्रहरण’ या नाटकाने मालवणी बोलीभाषेला मराठी रंगभूमीवर एक वेगळी ओळख दिली. या नाटकाने केवळ मराठी रंगभूमी समृद्ध केली नाही, तर मालवणी संस्कृतीलाही जागतिक स्तरावर पोहचवले. त्यांनी ‘जगर’ (१९९८) या मराठी चित्रपटाची पटकथाही लिहिली होती.
त्यांनी ‘वात्रट मेळा’, ‘वन रूम किचन’, ‘दोघी’, ‘वर भेटू नका’ अशा २० हून अधिक नाटके लिहिली. गवाणकर यांच्या लेखनानंतर मराठी रंगभूमीवर प्रादेशिक भाषांतील, विशेषतः मालवणी बोलीतील नाटकांना नवी उभारी मिळाली. त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना ‘मानाची संघटना लेखन कारकीर्द सन्मान’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
सन १९७१ मध्ये गंगाराम गवाणकर यांनी रंगभूमीवरील प्रवासाची सुरुवात ‘बॅकस्टेज’वरून केली. त्या काळात ते एमटीएनएलमध्ये नोकरी करत होते, मात्र नाट्यकलेवरील त्यांचे प्रेम इतके गाढ होते की नोकरी सांभाळत असतानाही त्यांनी रंगभूमीशी घट्ट नाते जोडले. गवाणकर यांनी आपल्या लेखनातून आणि दिग्दर्शनातून दारिद्र्य, संघर्ष आणि सामान्य माणसाचे आयुष्य कलात्मकतेने रंगमंचावर जिवंत केले.
गंगाराम गवाणकर यांच्या निधनाने मालवणी रंगभूमीने एक प्रगल्भ नाटककार आणि संवेदनशील भाषाशिल्पकार गमावला आहे. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

