(मुंबई)
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला ठाण्यात मोठा धक्का बसला आहे. माजी खासदार आनंद परांजपे यांनी पक्षातील सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज असलेले आनंद परांजपे गेल्या काही महिन्यांपासून पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा होती. यापूर्वी राज्यसभा आणि त्यानंतर विधान परिषद निवडणुकीतही संधी न मिळाल्याने त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.
राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी, शिवसेनेत प्रवेश
आनंद परांजपे यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सर्व पदांचा राजीनामा देत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे अधिकृत पत्र सादर केले. परांजपे यांच्याकडे प्रदेश सरचिटणीस, पक्ष प्रवक्ता तसेच ठाणे-पालघर जिल्हा समन्वयक अशी महत्त्वाची जबाबदारी होती. राष्ट्रवादीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी तात्काळ शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मंत्रालयासमोरील बाळासाहेब भवन येथे झालेल्या कार्यक्रमात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मंत्री उदय सामंत, दादा भुसे आणि माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधले.
विधान परिषद उमेदवारीवरून नाराजी वाढली
राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्यामुळे आनंद परांजपे नाराज होते. पक्षातील अंतर्गत राजकारण आणि सतत होत असलेल्या दुर्लक्षामुळे ते अस्वस्थ असल्याची चर्चा होती. मागील काही महिन्यांत त्यांनी आपली नाराजी अनेक बैठकीत आणि पक्ष नेतृत्वाकडे व्यक्त केली होती. मात्र त्यावर तोडगा न निघाल्याने अखेर त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
शिंदे सरकारमध्ये महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता
शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आनंद परांजपे यांची शासनाच्या एखाद्या महत्त्वाच्या प्राधिकरणावर नियुक्ती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील त्यांचा प्रभाव लक्षात घेता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात माझी कोणतीही नाराजी नव्हती. संघटनेत प्रामाणिकपणे काम करण्याचा माझा कायम प्रयत्न राहिला आहे. पक्ष भविष्यात जी जबाबदारी देईल, ती पूर्ण क्षमतेने पार पाडेन, असे माजी खासदार आनंद परांजपे यांनी स्पष्ट केले. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची तुलना प्रभू श्रीरामांच्या वनवासाशी केली. “प्रभू श्रीराम १४ वर्षे वनवासात होते. त्यानंतर रावण वध झाला. वनवास नेहमीच नकारात्मक नसतो. त्या काळात अनेक गोष्टी शिकायला मिळतात. अनुभव मिळतो आणि माणूस अधिक सक्षम होतो,” असे ते म्हणाले.
“मला घरातूनच शिवसेनेचा वारसा मिळाला आहे. शिवसेनेकडून मी दोन वेळा खासदार झालो आणि त्या प्रवासात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे मोठे योगदान राहिले. मी काही काळ दुसऱ्या पक्षात असलो तरी माझ्यात शिवसेनेचाच डीएनए कायम होता,” असे माजी खासदार आनंद परांजपे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री म्हणून काम करताना एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्य माणसाचा विचार केंद्रस्थानी ठेवत अनेक जनहिताचे निर्णय घेतले. त्यांच्या कार्यपद्धतीने आणि नेतृत्वाने मी प्रभावित झालो. त्यामुळे स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला.”
“मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. एकनाथ शिंदे आणि डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेसाठी प्रामाणिकपणे काम करण्याची माझी इच्छा आहे, आता माझी घरवापसी झाली आहे,” असे म्हणत आनंद परांजपे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आपल्या नव्या राजकीय प्रवासाचे संकेत दिले.
आनंद परांजपे यांच्या पक्षांतरामुळे अजित पवार गटाला ठाणे-पालघर पट्ट्यात मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

