(मुंबई)
मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली असून, एका 32 वर्षीय चार्टर्ड अकाउंटंटने ब्लॅकमेलिंग आणि मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. राज लीला मोरे असं या युवकाचं नाव असून, त्याने विष प्राशन करून जीवन संपवलं. या घटनेने व्यावसायिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी राहुल परवानी आणि सबा कुरैशी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अद्याप त्यांच्यावर कोणतीही अटक झालेली नाही.
राज मोरे याने मृत्यूपूर्वी तीन पानी सुसाइड नोट लिहून आपल्यावर आलेल्या मानसिक तणावाचं आणि ब्लॅकमेलिंगचं विस्तृत वर्णन केलं आहे. या पत्रात त्याने दोन व्यक्तींवर म्हणजेच राहुल परवानी आणि सबा कुरैशी यांचेवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या सांगण्यानुसार, या दोघांनी त्याचे खाजगी व्हिडीओ लीक करण्याची धमकी देत मागील १८ महिन्यांपासून त्याला सातत्याने ब्लॅकमेल केलं. या काळात त्याच्याकडून कोट्यवधी रुपये उकळले गेले आणि त्याच्या कंपनीच्या खात्यातील मोठी रक्कम आरोपींनी स्वत:च्या खात्यात वळवली, असा दावा सुसाइड नोटमध्ये करण्यात आला आहे.
व्हिडीओतील सामग्री अद्याप स्पष्ट नाही
या व्हिडीओमध्ये नेमकं काय होतं, याबाबत पोलिसांकडे कोणतीही स्पष्ट माहिती अद्याप उपलब्ध नाही. मात्र मोरे यांची आर्थिक परिस्थिती, गुंतवणूक माहिती, आणि वैयक्तिक बाबी या आरोपींना माहीत होत्या, हे त्याच्या पत्रातून स्पष्ट होते. इतकंच नाही, तर ब्लॅकमेल करणाऱ्यांनी त्याची लक्झरी कारसुद्धा बळजबरीनं घेतल्याचं समोर आलं आहे.
मोरे यांचा शेवटचा संदेश: माफ करा, पण निर्दोषांना वाचवा
राज मोरे यांनी आपल्या सुसाइड नोटमध्ये आईची माफी मागत कुटुंबीयांना स्वतःची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. आपल्या सहकारी दीपा लखानी यांच्याबाबत त्यांनी लिहिलं, “आज माझ्याकडे माफी मागण्यासाठी शब्द नाहीत, कारण मी तुमचा विश्वास तोडला आहे. पण हे शेवटचं होतं. माझा तुमचा विश्वासघात करण्याचा हेतू नव्हता.” तसेच, इतर सहकाऱ्यांबाबत स्पष्ट उल्लेख करत त्यांनी म्हटलं, “श्वेता आणि जयप्रकाशला काहीही माहित नव्हतं. कृपया त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई करू नका.”
राज मोरे यांच्या आईने देखील पोलिसांना सांगितलं की, मुलगा गेल्या काही महिन्यांपासून गंभीर मानसिक तणावात होता. पोलीस अधिकाऱ्यांना राजच्या खोलीतून तीन पानांची सुसाईड नोट सापडली, त्यातील एक त्याच्या आईला समर्पित होती. नोटमध्ये त्याने माफी मागितली आणि कुटुंबाला स्वतःची काळजी घेण्यास सांगितले.
दुसऱ्या पानावर, मोरे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना लिहिले.
“दीपा लखानी, आज माझ्याकडे माफी मागण्यासाठी शब्द नाहीत, कारण मी तुमचा विश्वास तोडला. पण माझ्यावर विश्वास ठेवा, ही शेवटची वेळ होती. तुमचा विश्वास तोडण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. मी जे काही फसवणूक केली ते मी स्वतः केली; कोणालाही काहीही कळले नाही. मी स्टेटमेंट (खात्यात) फेरफार केला नाही. श्वेता आणि जयप्रकाश यांना काय घडत आहे याची अजिबात कल्पना नव्हती. कृपया त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई करू नका,” असे त्यांनी लिहिले.
तिसऱ्या पानावर मोरे यांनी राहुल आणि सबा यांना त्यांच्या मृत्यूसाठी जबाबदार धरल्याचा उल्लेख केला होता.
“मी, राज मोरे, आज आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येसाठी राहुल परवानी जबाबदार आहे. त्याने मला ब्लॅकमेल केले आणि अनेक महिने तो असे करत होता. त्याने मला माझी बचत रक्कम त्याला देण्यास भाग पाडले आणि माझ्या कंपनीच्या खात्यातून पैसेही चोरले. माझ्या मृत्यूसाठी राहुल परवानी आणि सबा कुरेशी जबाबदार आहेत,” असे त्याने लिहिले.

