(चिपळूण)
गेली ५१ वर्षे सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या रोटरी क्लब चिपळूण तर्फे विशेष मुलांसाठी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. ‘सितारे जमीन पर’ या प्रेरणादायी चित्रपटाचे खास प्रदर्शन अतिथी थिएटर येथे आयोजित करण्यात आले होते.
हा चित्रपट जयदीप मोणे उद्योग केंद्र चिपळूण व जिद्द मतिमंद मुलांची शाळा या संस्थांमधील विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालक व शिक्षकांसाठी दाखवण्यात आला. आमिर खान अभिनित ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट विशेष मुलांच्या भावना, संघर्ष आणि कौशल्यांची हळुवार मांडणी करतो. त्यांच्या जीवनात आत्मविश्वास, प्रेरणा आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमामागील उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये स्व-प्रेरणा, आत्मभान आणि अभिव्यक्तीचा आत्मविश्वास जागवणे. रोटरी क्लबच्या वतीने असा विश्वास व्यक्त करण्यात आला की, या चित्रपटाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नव्याने स्वतःला समजून घेण्याची संधी मिळेल आणि ‘आपण इतरांपेक्षा कमी नाही’ ही भावना त्यांच्यामध्ये बळावेल.
या कार्यक्रमास रोटरी क्लबचे अध्यक्ष अविनाश पालशेतकर, प्रो. चेअरमन राजेश ओतारी, सचिव डॉ. माधव बापट (प्राचार्य डी.बी.जे. महाविद्यालय), वैभव रेडीज, शैलेंद्र सावंत, डीजी प्रसाद सागवेकर, नितीन देवळेकर, तसेच निवृत्त उपजिल्हाधिकारी शंकर पालशेतकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
शाळेचे प्राचार्य यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “आमचे विद्यार्थी नृत्य, नाट्य, अभिनय यात सहभागी होतातच, मात्र हा चित्रपट पाहून त्यांच्या प्रतिभेला नवे बळ मिळेल. आत्मविश्वास वाढेल आणि कदाचित एखाद्या विद्यार्थ्याच्या मनात चित्रपटसृष्टीत काम करण्याची प्रेरणा निर्माण होईल, हेच या कार्यक्रमाचे खरे यश ठरेल.”
या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक सुनील शिंदे, विशेष शिक्षक उमेश कुचेकर, तसेच कीर्ती गायकवाड, प्रसन्ना रेडीज, प्रकाश बलाढ्ये, रेखा खंडजोडे, सुनील मयेकर आदी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. अतिथी थिएटर यांचे या उपक्रमास विशेष सहकार्य लाभले.

