(मुंबई)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे हे तब्बल १९ वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर एकत्र आले आणि ५ जुलै रोजी पार पडलेल्या विजयी मेळाव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली. उद्धव ठाकरे यांनी “एकत्र आलोय, ते एकत्र राहण्यासाठी” असे स्पष्टपणे सांगत युतीचे संकेत दिले. मात्र, राज ठाकरे यांनी या संधीचा वापर करत संयमित आणि सावध भूमिका घेतली आहे.
“बोलायचं असेल, तर परवानगी घ्या”
या मेळाव्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये युती होणार की नाही, याबाबत चर्चेला उधाण आले असतानाच राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना “युतीबाबत बोलायचं असेल, तर परवानगी घ्यावी लागेल” असे सांगत चर्चा टाळली. त्यामुळे युतीसंदर्भात त्यांच्या मनात अजूनही संभ्रम असल्याचे संकेत मिळतात. मेळाव्यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील भाजपावर थेट टीका केली, तर राज ठाकरे यांनी भाषा आणि मराठी अस्मितेवर लक्ष केंद्रित करत राजकीय टीका टाळली. याच भूमिकेची भाजपकडून स्तुती झाली. त्यामुळे राज ठाकरे कोणत्या राजकीय दिशा घेणार याबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहेत.
जनमताचा विचार घेण्यासाठी ‘वेट अँड वॉच’ भूमिका
राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना युतीबाबत कुठलेही वक्तव्य न करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे त्यांनी ‘वेट अँड वॉच’ भूमिका स्वीकारल्याचे स्पष्ट होते. मराठी मतदारांचा कल, आगामी निवडणुकांची गणितं आणि स्वतःची राजकीय स्वतंत्र ओळख हे सर्व पैलू लक्षात घेऊनच ते निर्णय घेतील, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.
शिंदे गटाचा राज ठाकरेंबाबत सॉफ्ट कॉर्नर?
दरम्यान, सरकारने रद्द केलेल्या त्रिभाषा सूत्राच्या जीआरनंतर आयोजित मेळाव्यात, राज ठाकरे यांनी कोणत्याही नेत्यावर थेट टीका केली नाही. उलट, उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडलं, ज्याला प्रत्युत्तर देताना शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के म्हणाले, “राज ठाकरे यांनी आमच्यावर काही बोलले नाही, म्हणून आम्हीही त्यांच्यावर काही बोलणार नाही. मात्र, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतच राहू.” सूत्रांच्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंविषयी कुठलेही वक्तव्य न करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे शिंदे गटाचा राज ठाकरेंबाबत सॉफ्ट कॉर्नर कायम असल्याचे मानले जात आहे.
राज ठाकरे यांचा नेहमीप्रमाणेच विचारपूर्वक निर्णय घेण्याचा पवित्रा कायम असून, आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे राजकीय समीकरण कसे जुळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाकरे बंधूंची राजकीय युती केवळ मुंबईतच नव्हे, तर संपूर्ण राज्याच्या राजकारणाला कलाटणी देऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

