(नवी दिल्ली)
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय गुप्तचर यंत्रणांनी एक मोठं ऑपरेशन राबवत प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिला अटक केली आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय (ISI) साठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणात ज्योतीसह एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे. ‘ट्रॅव्हल विथ जो’ या यूट्यूब चॅनेलद्वारे प्रसिद्ध असलेल्या ज्योतिसह हरियाणा आणि पंजाबमधून एकूण सहा जणांना या प्रकरणी अटक झाली आहे.
‘ट्रॅव्हल विथ ज्यो’ या नावाने युट्युब चॅनेल चालवणाऱ्या ज्योती मल्होत्रा हिचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. २०२३ मध्ये पाकिस्तानचा दौरा करताना ती पाकिस्तानच्या उच्चायोगातील कर्मचारी एसहास-उर-रहीम ऊर्फ दानिश याच्या संपर्कात आली. या ओळखीतून तिचे संबंध पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांतील अली अहसान आणि शाकिर ऊर्फ राणा शहबाज या एजंट्सशी जोडले गेले.
गुप्तचर यंत्रणांच्या तपासात उघड झाल्यानुसार, ज्योती आणि पाकिस्तानी एजंट्समध्ये व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, आणि स्नॅपचॅटसारख्या एन्क्रिप्टेड प्लॅटफॉर्मवरून संवाद होत असे. ज्योतिने तिच्या यूट्यूब चॅनेलवर पाकिस्तानातील प्रवासाचे अनेक व्हिडिओ प्रसिद्ध केले, ज्यात तिने पाकिस्तानचे सकारात्मक चित्र रंगवले. तपास यंत्रणांचा दावा आहे की, पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेने ज्योतिचा वापर प्रचारासाठी आणि भारतातील संवेदनशील ठिकाणांबाबत माहिती मिळवण्यासाठी केला. ती सोशल मीडियावरून पाकिस्तानविषयी सकारात्मक प्रचार करत होती, आणि काही संवेदनशील माहिती पाकिस्तानी एजंट्सना पुरवली असल्याचेही निष्पन्न झाले आहे.
तपासात आणखी एक धक्कादायक बाब पुढे आली असून, ज्योती एका पाकिस्तानी एजंटच्या प्रेमात पडली होती. अलीकडेच त्या दोघांनी इंडोनेशियातील बाली येथे भेट घेतल्याची माहितीही उघड झाली आहे. ज्योतीच्या सोशल मीडियावरील प्रभावाचा वापर भारतविरोधी प्रचारासाठी केला जात होता, अशीही माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.
पाकिस्तानातून परतल्यानंतर ज्योती च्या ऑनलाइन हालचाली, विदेशी प्रवास आणि संपर्कांवर गुप्तचर यंत्रणांनी लक्ष ठेवले होते. पुरावे मिळाल्यानंतर हिसार येथील सिव्हिल लाइन्स पोलिसांनी ज्योति ला अटक केली. तिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १५२ आणि ऑफिशियल सिक्रेट्स अॅक्ट, १९२३ च्या कलम ३, ४ आणि ५ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. सध्या तिच्यावर पाच दिवसांची पोलीस कोठडी लागू असून, हिसारच्या आर्थिक अपराध शाखेकडे तपास सोपवण्यात आला आहे. या प्रकरणामुळे देशांतर्गत सुरक्षेच्या बाबतीत चिंता व्यक्त केली जात असून, गुप्तचर यंत्रणांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली आहे. सध्या या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे.