( चिपळूण )
रत्नागिरी जिल्ह्यातील जंगलामध्ये चार नर वाघ, सहा ब्लॅक पँथर (काळी बिबटे) आणि मोठ्या प्रमाणात माकड, वानर आढळून आले आहेत. हे सर्व प्राणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नोंदवले गेले आहेत. जिल्ह्यात वन्यजीवांची ही वाढती वस्ती लक्षात घेता वनविभाग सजग झाला आहे.
इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण येथे शनिवारी सामाजिक वनीकरण विभाग रत्नागिरी, ग्लोबल चिपळूण टुरिझम आणि वनविभागाच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या वेळी विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई बोलत होत्या. जिल्ह्यातील वन क्षेत्रामध्ये केवळ एक टक्का जमीन वनविभागाच्या ताब्यात असून उर्वरित ९९ टक्के क्षेत्र हे खासगी मालकीचे आहे. त्यामुळे अनेकदा वन्यजीवांच्या संरक्षणात अडथळे येतात. मात्र वन्य प्राण्यांचा संचार हे विशेष लक्ष वेधणारे आहे, असे देसाई यांनी स्पष्ट केले.
यापुढे त्यांनी सांगितले की, वाघांच्या हालचाली सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे दिसून येतात. तसेच सहा काळ्या बिबट्यांचीही नोंद झाली आहे. या शिवाय माकड व वानरांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना कधीकधी वन्यप्राण्यांमुळे मोठे नुकसान सहन करावे लागते. गतवर्षी अशा नुकसानीपोटी सुमारे ७५ लाख रुपयांची भरपाई देण्यात आली आहे, असेही त्यांनी नमूद केले.
खैर लागवड म्हणजे शेतकऱ्यांची भविष्यगाठ
खैर प्रजातीच्या रोपांबाबत सांगताना त्यांनी स्पष्ट केले की, ही रोपे म्हणजे शेतकऱ्यांसाठी भविष्यातील आर्थिक गुंतवणूक आहे. त्यामुळे ती जपून वाढवावी. दरवर्षी अशीच मोफत रोपवाटप योजना राबवण्यात येईल. कार्यशाळेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला असून, वन विभागाने वनसंवर्धनाबरोबरच शेतकऱ्यांच्या हिताची दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.