( विशेष /प्रतिनिधी )
आगामी रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये उमेदवारांच्या इच्छुकांची प्रचंड गर्दी निर्माण झाली आहे. या गर्दीमुळे दोन्ही पक्षांत ‘स्वबळावर लढाई’चे सूर अधिकच ठळकपणे उमटू लागले असून, युतीच्या समीकरणावर अनिश्चिततेचे सावट दिसू लागले आहे.
शिवसेनेकडून प्रत्येक प्रभागात तीन ते चार उमेदवार इच्छुक असल्याने, उद्योगमंत्री व पालकमंत्री उदय सामंत यांनी “एका घरातून एकच उमेदवार” या सूत्रावर विचार सुरू केला आहे. मात्र, इच्छुकांची भाऊगर्दी कमी होत नसल्याने, भाजपनेही स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची तयारी पूर्ण केली असल्याची चर्चा आहे. भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आणि शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षातील गटबांधणी आणि संघटनात्मक तयारी सुरू आहे. त्यामुळे भाजप ‘स्वबळावर लढण्याचा’ पर्याय खुला ठेवत असल्याचे संकेत मिळत आहेत.
नगराध्यक्ष पदासाठी शिंदे गटाच्या शिवसेनेकडून दावा करण्यात येत असताना, भाजपलाही या पदाची तीव्र इच्छा आहे. दोन्ही पक्षांचा नगराध्यक्षपदावर असलेला आग्रह लक्षात घेता, महायुतीत फूट पडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. शिवसेनेकडे नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदांसाठी मोठ्या प्रमाणावर इच्छुक असल्यामुळे भाजपला समाधानकारक जागा मिळतील की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
निवडणुकीनंतर ‘मैत्रीपूर्ण’ फॉर्म्युल्याची चर्चा
युतीवर ताण कायम राहिल्यास, निवडणूक स्वतंत्रपणे लढवून निकालानंतर एकत्र येण्याचा ‘मैत्रीपूर्ण लढत’ फॉर्म्युला लागू केला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांच्यासमोर उमेदवार निवड आणि नाराजांचे समाधान करण्याची मोठी कसरत उभी राहिली आहे.
भाजपची स्वबळावरील मोहीम
गेल्या काही महिन्यांपासून भाजपने स्वबळावर लढण्याची तयारी वेगाने सुरू केली आहे. महिला मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात असून, महिला नेत्या वर्षा ढेकणे यांच्या पुढाकाराने प्रचारयंत्रणा बळकट करण्यात आली आहे. विविध सामाजिक कार्यक्रम आणि स्थानिक प्रश्नांवर आंदोलने, निवेदने यांद्वारे पक्षाने आपली उपस्थिती ठळक केली आहे.
‘महायुतीचे घोडे अडलेच तर…’
शिवसेनेकडून पालकमंत्री उदय सामंत यांच्या विकासकामांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवली जात असताना, भाजपकडून जनतेशी थेट संवाद साधण्यावर भर दिला जात आहे. परिणामी, महायुतीची गाडी अडलीच तर दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे मैदानात उतरण्यास सज्ज आहेत. सध्याच्या स्थितीत रत्नागिरीत महायुतीच्या निवडणुकीचे गणित गुंतागुंतीचे बनले असून, शेवटच्या क्षणी ‘युती’ की ‘स्वबळ’ हा प्रश्नच चर्चेचा मुख्य मुद्दा ठरत आहे.

