( रत्नागिरी/ प्रतिनिधी )
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी येथे प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून कार्यरत असलेले डॉ. बाळासाहेब रामदास चव्हाण यांची नुकतीच भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR) अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय भूजलीय मत्स्य संशोधन संस्था, प्रयागराज (उत्तर प्रदेश) येथील प्रादेशिक केंद्राच्या ‘प्रमुख’ पदावर निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
प्रयागराज येथील ही संस्था देशातील भूजलीय (इनलॅंड) मत्स्य संशोधन क्षेत्रात अग्रगण्य मानली जाते. या संस्थेच्या प्रमुखपदी कोकणातील मत्स्य क्षेत्रातील एक तज्ज्ञ म्हणून डॉ. चव्हाण यांची नियुक्ती होणे, ही रत्नागिरीसाठी आणि कोकणसाठी भूषणावह बाब मानली जात आहे. डॉ. चव्हाण गेली २५ वर्षे मत्स्य महाविद्यालय, शिरगाव येथे अध्यापन आणि संशोधन क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पदव्युत्तर शिक्षण भारतीय कृषी अनुसंधान परिषद अंतर्गत केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था, मुंबई येथून पूर्ण केले असून, पीएच.डी. चे शिक्षण त्यांनी थायलंड येथील एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संस्थेतून घेतले आहे.
त्यांनी शिरगावमधील अनेक विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या असून, शेतकऱ्यांसाठीही विविध प्रशिक्षण कार्यक्रम, संशोधन प्रकल्प आणि बाह्य अनुदानातून उभारलेल्या योजना यांचा लाभ दिला आहे. त्यांचे अनेक शोधनिबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सादर झाले असून, संशोधन क्षेत्रात त्यांचे स्वतंत्र योगदान आहे. या यशाबद्दल कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. संजय भावे यांनी डॉ. चव्हाण यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.