(संगमेश्वर / एजाज पटेल)
केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नांतून ग्रामविकास मंत्रालयाने सुरु केलेले ‘मेरी पंचायत’ हे मोबाईल अॅप ग्रामपंचायतींच्या कारभारात पारदर्शकता आणि सुलभता आणण्यास मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरत आहे. डिजिटलीकरणाच्या युगात स्थानिक स्वराज्य संस्थांनीही तंत्रज्ञानाशी हातमिळवणी केल्याचे हे ठळक उदाहरण मानले जात आहे.
या अॅपद्वारे ग्रामस्थांना आपल्या गावच्या ग्रामपंचायतीच्या कामकाजाची सर्व माहिती थेट मोबाईलवर मिळू शकते. त्यामुळे आता कार्यालयीन दैनंदिन फेऱ्यांची गरज उरलेली नाही.
✅ ‘मेरी पंचायत’ अॅपद्वारे मिळणारी माहिती:
- गावातील विविध योजनांची सद्यस्थिती
- निधीचे वितरण व त्यावरील खर्च
- ग्रामपंचायतीच्या बँक खात्यांतील शिल्लक
- जलस्रोत, नळजोडणी व पाणी तपासणी संबंधित माहिती
- विकास कामांची यादी आणि प्रलंबित कामे
- विविध समित्यांचे अध्यक्ष व सदस्यांची नावे
- नोटीस बोर्डावरील अद्ययावत सूचना
- ग्रामपंचायतीला मिळालेले अनुदान आणि त्याचा वापर
ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग
या अॅपमधील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ग्रामस्थांना २५० शब्दांत अभिप्राय नोंदवण्याची सुविधा देण्यात आली आहे. कोणते काम चांगले झाले, कोणत्या योजनेत त्रुटी आहेत, याबाबतचा फोटोसहित अभिप्राय ग्रामस्थ देऊ शकतात.
निधी व कारभारावर थेट नजर
ग्रामपंचायतींना केंद्र व राज्य सरकारकडून सरळ निधी मिळतो. या निधीचा योग्य वापर होतोय का, कोणती कामे रखडली आहेत, याबाबतची माहिती अॅपवर उपलब्ध असल्याने ग्रामस्थ स्वतःहून देखरेख करू शकतात. त्यामुळे लोकसहभाग वाढण्यास मदत होत आहे, आणि पंचायत कार्यालयातील पारदर्शकता सुनिश्चित होत आहे. ग्रामपंचायतीमधील विविध समित्यांचे अध्यक्ष, सदस्य, त्यांच्या कार्यकक्षा, सूचना, अनुदानाचा तपशील ही सर्व माहिती अॅपवर सहज उपलब्ध आहे.
तंत्रज्ञानाचे प्रभावी साधन
‘मेरी पंचायत’ हे अॅप केवळ माहिती देणारे माध्यम नाही, तर ग्रामशासनाच्या पारदर्शक कारभाराचा नवा अध्याय आहे. गावातील निधी, निर्णय, आणि विकासकामांवर ग्रामस्थांची थेट नजर राहणार आहे. डिजिटल युगातील या महत्त्वाच्या टप्प्यामुळे गावचा कारभार आता ग्रामस्थांच्या बोटाच्या एका क्लिकवर आला आहे.